छत्रपती संभाजीनगर : शहराला इंदूरपेक्षाही स्वच्छ, सुंदर करण्याचा विडा महापालिका प्रशासनाने उचलला आहे. त्यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे. नागरिक महापालिकेच्या कार्यपद्धतीला मोठ्या प्रमाणात सहकार्यसुद्धा करीत आहेत. १ ऑगस्टनंतर जे नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
वर्गीकरण केलेलाच कचरा पडेगाव, चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर गेला पाहिजे, असा दंडकच प्रशासनाने घातला आहे. नागरिकांना सवय लागावी, स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी १ हजार कर्मचारी घरोघरी जाऊन प्रबोधन करीत आहेत. नागरिकांकडून प्रश्नावली भरून घेतली जात आहे. ओला-सुका कचरा कसा वेगळा करावा याबाबचे स्टिकर्स घरावर चिकटवणे सुरू झाले आहे. ३१ जुलैपर्यंत १०० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वर्गीकृत कचरा मिळाला नाही तर रेड्डी कंपनीचे कंत्राटदाराचे कर्मचारी, वाहनचालक, मनपाचे जवान आणि स्वच्छतानिरीक्षक, वॉर्ड अधिकारी यांचा पगार थांबविण्यात येईल. १ ऑगस्टपासून घराघरांतून कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा मिळाला नाही तर नागरिकांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचरा वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्या, हॉटेल, दुकाने आदींना बक्षिसे दिली जाणार आहेत.
आजपर्यंत काय झाले?१४ जुलैपर्यंत ७ हजार ८०० घरांना भेटी देण्यात आल्या५१ टक्के वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडीत येत होता.१३ जुलैपर्यंत ७१ टक्के कचरा वर्गीकरण केलेला मिळत आहे
इच्छाशक्तीचा मोठा अभावशहरातील घराघरांतून कचऱ्याचे वर्गीकरण होणे आवश्यक होते. परंतु, मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे वर्गीकरण करून कचरा मिळत नव्हता. जे सुरू आहे, ते सुरू राहू द्या, ही मानसिकता होती. रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच स्मार्ट ओळखपत्र दिले जातील. सार्वजनिक जागांवर स्वच्छता दिसून आली नाही तर कार्यालयप्रमुखांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासक यांनी सांगितले.
वॉकीटॉकीचा प्रभावी वापरएका खासगी कंपनीने डेमोसाठी मनपाला १५ वॉकीटॉकी दिले आहेत. याचा वापर घनकचरा, अग्निशमन दलात केला जाईल. स्वच्छतेला सध्या प्राधान्य देण्यात आले असून, कचरा कुठेही अधिक वेळ पडून राहणार नाही. तक्रार येताच पटकन कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.