औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचा साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट २.९४ टक्के असून, व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी ६.८१ टक्के आहे. त्यामुळे संपूर्ण औरंगाबाद जिल्हाच लेव्हल-१ मध्ये आला आहे. परिणामी, संपूर्ण जिल्हाच अनलाॅक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातील निर्बंध हटविले जणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे ६ जून रोजी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णांची टक्केवारी ५.४६ टक्के होती, तर अजून व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी २०.३४ टक्के होती.
पातळींची वर्गवारी ही पाॅझिटिव्हिटी दर,
ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेआधारे
औरंगाबाद ग्रामीण भागाचे स्थान लेव्हल-३ मध्ये (पातळी ३) आले, तर औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी २.२४ टक्के होती, तर व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी २२.१९ होती. त्यामुळे महापालिका क्षेत्राचे शासन वर्गवारीनुसार स्थान लेव्हल-१ मध्ये आले होते. त्यामुळे शहरातील सर्व निर्बंध हटले. मात्र, ग्रामीण भाग पातळी-३ मध्ये असल्याने तेथे काही निर्बंध होते.
गेल्या दोन आठवड्यांत सक्रिय रुग्णांची संख्या व नव्या बाधितांची संख्या झपाट्याने घटली. त्यामुळे गेल्या आठवडाभराचा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट २.९४ टक्के, तर ऑक्सिजन बेड वापल्याचे प्रमाण ६.६१ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच पातळी- १ मध्ये समाविष्ट झाला आहे. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर आगामी दिवसांत निर्बंधांसंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. १७ जूनला ‘ब्रेक द चेन’संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात पाॅझिटिव्हिटी दर व व्यापलेल्या खाटांची माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
---
एकूण ऑक्सिजन बेड - ४,०२१
एकूण व्यापलेले ऑक्सिजन बेड - २७४
व्यापलेले ऑक्सिजन बेड - १२९
रिक्त ऑक्सिजन बेड - ३,४७०
व्यापलेले व्हेंटिलेटर बेड - १४५
रिक्त व्हेंटिलेटर बेड - २७७
रिक्त ऑक्सिजन बेड - ३,७४७
एकूण वापरात ऑक्सिजन बेड - ६.८१ टक्के
आठवडाभरात झालेल्या तपासण्या - २६,९७२
बाधित आढळलेले रुग्ण - ७९३
पाॅझिटिव्हिटी दर - २.९४
----