लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगरपालिका इमारतीसाठी जि.प. व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इमारतींदरम्यान असलेल्या रिकाम्या एक एकर जागेचे हस्तांतरण करून घेण्यात आले आहे. पालिकेची सध्याची इमारत शॉपिंग कॉम्पलेक्सच्या गाळ्यांमध्ये असून ते रिकामे झाल्यास पालिकेच्या महसुलात भर पडणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी मंजुरी दिल्यानंतर पालिकेने २.६९ कोटी रुपये भरले. त्यानंतर ही जागा पालिकेला मिळाल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली. हिंगोली पालिकेला सुरुवातीला इमारत नव्हती. पाण्याच्या टाकीखाली कारभार चालत होता. तो तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या प्रयत्नातून पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वर बांधकाम करून तेथे हलविण्यात आला. त्यानंतर आता विद्यमान नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीत पालिका इमारतीस १0 कोटींची मागणी केली होती. त्याला मंजुरीही मिळालेली आहे. त्यामुळे येत्या काळात पालिकेने अंदाजपत्रकांसह विविध बाबींचे काम गतिमान केल्यास येत्या तीन ते चार महिन्यांत या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण होऊ शकते. २५ कोटींच्या पत्रासोबतच तरतुदीलाही मंजुरी असल्याचे सांगण्यात आले.हिंगोली शहराला हागणदारीमुक्तीत मिळालेल्या तीन कोटींच्या निधीतून पालिकेने एक एकर जागा २.६९ कोटी रुपयांत घेतली आहे. ही रक्कमही जमा केली आहे. या रकमेतून शहरातील इतर कामे करण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न होता. मात्र हा निधी इमारतीच्या जागेसाठी दिल्याने ही इमारतही आता इतर प्रशासकीय इमारतींजवळच उभी राहणार आहे. याच परिसरात सर्व इमारती आधीच आहेत. त्यामुळे थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली हे कार्यालय येणार आहे. शिवाय दोन्ही बाजूंनी रस्ते व मोकळी जागा राहणार आहे. त्यामुळे पार्किंगसह इतर समस्याही निर्माण होणार नाहीत. शिवाय प्रशासकीयदृष्ट्या सुसज्जता आणणेही सोयीचे ठरेल.
न.प. इमारतीसाठी जागेचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:57 PM