सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण
नगरनाका येथील घटना: शिस्तीच्या दलातील जवानाचे बेशिस्त वर्तन
औरंगाबाद: विना मास्क प्रवाशाची जीप थांबविल्याने निम लष्करी दलातील एनएसजी कमांडोने सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नगरनाका येथे घडली. त्याला रोखणाऱ्या पोलिसांसोबत झटापट करून त्यांचे कपडे फाडले. पोलिसांनी आरोपी जवानाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
गणेश गाेपीनाथ भुमे (३४, रा. फुलंब्री) असे मारहाण करणाऱ्या जवानाचे नाव आहे. तो निमलष्करी दलात एनएसजी कमांडो म्हणून आसाम येथे व्हीआयपी सुरक्षा विभागात कार्यरत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छावणी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भागिले आणि अन्य कर्मचारी नगरनाका येथे बुधवारी ४ वाजेपासून नाकाबंदी करीत होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वाळूजकडून आलेल्या जीपमधील दोघांनी मास्क घातले नसल्याचे पोलीस हवालदार घोडेले यांना दिसले. त्यांनी जीपचालकास रोखले व विनामास्क असल्यामुळे दंड ठोठावला. जीपमध्ये बसलेल्या जवानाने त्यांच्यासोबत हुज्जत घालून पावती घेण्यास नकार देत ते पुढे निघाले. घोडेले यांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केल्याने जवानाने त्यांना जीपमधूनच ढकलले. हे पाहून सहायक निरीक्षक भागिले त्यांच्याकडे गेले. त्याने आपण एनएसजी कमांडो असल्याचे सांगितले. भागिले यांनी त्यास जीपमधून खाली उतरुन पावती घ्या, असे बजावले. याचा राग आल्याने त्याने भागिले यांच्या चेहऱ्यावर तीन ठोसे मारले. त्यामुळे अन्य पोलीस धावले असता, त्याने त्यांच्यासोबतही झटापट केली. यात पोलीस हवालदार टाक यांची पॅण्ट फाटली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले तेव्हा तो दारूच्या नशेत तर्र असल्याचे दिसले. भागिले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त विवेक सराफ यांनी छावणी ठाण्यात धाव घेतली. आरोपी गणेश भूमेविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यास अटक केल्याचे उपायुक्त खाटमोडे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पगारे करीत आहेत.
-------------
चौकट
जवानाच्या मुख्यालयास फोन करून कळविले
गणेश भूमेला ताब्यात घेतल्यानंतर खाटमोडे यांनी त्याची चौकशी केली. त्याच्या युनिटचे अधीक्षक एस. महेंद्र यांना खाटमोडे यांनी कॉल करून भूमेच्या प्रतापाची माहिती दिली. शिवाय त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्यास अटक केली जात असल्याचे सांगितले.