औरंगाबाद : शहरात कोरोना मृत्यूची संख्या घटताच म्युकरमायकोसिसने डोके वर काढले आहे. रुग्णसंख्या कमी होत असलीतरी मृत्यूसत्र थांबायला तयार नाही. शुक्रवारी तीन जणांचा बळी गेल्यानंतर रविवारी पुन्हा म्युकरमायकोसिसने तिन जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १४८ रुग्णांचा बळी गेला असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५० इतकी आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होत आहे. शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील आणि बाहेरील काही जिल्ह्यांतूनही रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत येत आहेत. या आजाराचे गांभीर्य विचारात घेऊन महापालिकेने दररोज माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये म्यूकरमायकोसिसच्या ११५९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मनपाकडून प्राप्त अहवालानुसार रविवारी म्युकरमायकोसिसच्या आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोघांचा घाटी रुग्णालयात तर एकाचा बजाज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने एक रुग्ण दाखल झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ११५९ वर पोहचली तर आजारातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ८६१ इतकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णामध्ये एमआयटी रुग्णालयात सर्वाधिक ३० रुग्ण उपचार घेत असून त्यापाठोपाठ घाटी रुग्णालयात २७, डॉ. हेडगेवार रुग्णालय २५, एमजीएम २५, जिल्हा रुग्णालय ११, या प्रमाणे रुग्ण आहेत.