संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ५० हजारांचा आकडा केव्हाच पार केला आहे. होय! ५० हजारांचाच. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमअंतर्गत राज्यस्तरावर नोंद झालेली ही आकडेवारी आहे. याउलट जिल्ह्यातील यंत्रणेने २१ फेब्रुवारीपर्यंत एकूण रुग्णसंख्या ४८ हजार ६३८ झाल्याची माहिती दिली. दोन्ही अहवालात तब्बल २ हजार रुग्णसंख्येची तफावत आहे.
राज्यस्तरावर आरोग्य यंत्रणेच्या नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण बधितांची संख्या ५० हजार ८७४ झाली आहे. यातील ४८ हजार ३४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १२६४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर जिल्ह्यातील यंत्रणेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नेमके रुग्ण किती आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या आकडेवारीनुसार अहवाल तयार केला जातो. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
---
एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीची नोंद रविवारी...
राज्याच्या नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण १२७० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत १२५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी रविवारी जिल्हा माहिती कार्यालयाने दिली. १६ मृत्यू लपवले जात आहे का, असाही प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे राज्याच्या रविवारच्या अहवालात नोंद झालेल्या ३५ मृत्यूपैकी १२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. यात औरंगाबादेतील एका मयत रुग्णाचा समावेश आहे.
----
आरोग्य अधिकारी म्हणाले...
आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, याविषयी अधिक माहिती घेतली जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके म्हणाले, रुग्णसंख्या लपविण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. घाटी आणि विद्यापीठातील प्रयोगशाळांकडून जे अहवाल येतात, त्यावरून माहिती दिली जाते.
---
राज्याच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण
एकूण बाधित - ५०,८७४
एकूण कोरोनामुक्त - ४८,३४०
उपचार सुरू - १२६४
----
जिल्ह्याच्या नोंदीनुसार कोरोना रुग्ण (२१ फेब्रुवारीपर्यंत)
एकूण बाधित - ४८,६३८
एकूण कोरोनामुक्त - ४६,४६३
उपचार सुरू - ९२१