औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत स्थिती गंभीर,
मृत्यूदर नियंत्रित ठेवण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान
औरंगाबाद : जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत सध्या रुग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढत असून, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सोमवारी सूचित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना, लसीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गव्हाणे यांनी आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणांना निर्देशित केले.
यावेळी जि. प. सीईओ मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. ज्योती बजाज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. नांदापूरकर आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या काही दिवसात वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उपचार सुविधा पुरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवाव्यात. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी अधिक खबरदारी बाळगत चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे गव्हाणे म्हणाले.
सीईओ गोंदावले यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवित असताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत संबंधिताला घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे सुचविले. जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखणे आणि मृत्यू दर नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यादृष्टीने सर्वांनी पूर्वानुभवासह आणि समन्वयपूर्वक ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डीसीएच यासह सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, औषधोपचार साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे सूचित करून गव्हाणे यांनी, यावेळी संसर्ग हा पूर्वीपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. जनजागृती व मास्क वापर न करणाऱ्यांवर आवश्यक ती दंडात्मक कारवाई करावी. परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयपूर्वक काम करण्याच्या सूचना प्र. जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी दिल्या.