औरंगाबाद : मराठवाड्यात अडीच महिन्यांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा दोनशेच्या घरात पोहोचला आहे. शासकीय मदतीस विलंब होत असून शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी नेमलेल्या मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शनही कागदावरच असल्याचे दिसते आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल बीडमध्ये ३१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तीन-चार वर्षांपासून सततचा दुष्काळ, कमी पाऊस, घटलेले शेतीचे उत्पादन, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेले नुकसान, कर्जांचा डोंगर, कुटुंबाच्या उदरनिवार्हाची तसेच मुला-मुलींच्या शिक्षण, लग्नाच्या चिंतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.गेल्या वर्षात सुमारे ११५० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. आत्महत्यांचे हे सत्र २०१६ मध्येही कायम राहिले. विभागातील हिंगोली वगळता इतर सातही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. २०१६ मध्ये जानेवारी ते ७ मार्च या कालावधीत १९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ६५ शेतकऱ्यांचे कुटुंब शासनाच्या एक लाख रुपयांच्या मदतीस पात्र ठरले. तर ४२ आत्महत्या या निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आल्या.
शेतकरी आत्महत्यांचा आकडा १९४ वर
By admin | Published: March 14, 2016 12:39 AM