औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी काेरोनाग्रस्तांचे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा आता हजाराच्या उंबरठ्यात गेला आहे.
घाटी येथे नुकतीच डेथ ऑडिट संदर्भात बैठक झाली. मृत्यूच्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात दि. १३ मे रोजी मृत्यूदर २. ५२ टक्के होता. मंगळवार दि. ६ रोजीचा मृत्यूदर २. ८२ टक्क्यांवर गेला होता. दि. १ ते ६ ऑक्टोबर दरम्यानच तब्बल ३८ मृत्यू जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बहुतांश रूग्णांना अन्य आजारही होते. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आदी आजारांमुळे प्रकृती अधिक गंभीर होते. त्यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्णांचा मृत्यू ओढावतो. गंभीर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.