औरंगाबाद : दरवर्षी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील पाच ते सात वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या पन्नास टक्के झाली आहे. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी होत असताना प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही प्रयत्न करण्यात येत नाहीत, हे विशेष. मनपा शाळांमधील विद्यार्थी खाजगी संस्थाचालक अक्षरश: पळवून नेतात, तरी प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही.मनपाच्या शहरात ७० शाळा असून, त्यात मराठी माध्यमाच्या ४५, उर्दू माध्यमाच्या १८ तर द्विभाषीय ७ शाळांचा समावेश आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अत्यंत गरीब घरातील असतात. खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मनपा शाळेतील विद्यार्थीही चांगले दिसावेत म्हणून मोफत गणवेश, इस्कॉनची साजूक तुपाची खिचडी देण्यात येते. गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. दरवर्षी जून महिन्यात खाजगी संस्थाचालक मनपा शाळांचे विद्यार्थी पळवून नेतात. विद्यार्थी पळवून नेणाऱ्या संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे आदेशही आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. २००७-०८ मध्ये मनपाच्या ७२ शाळांमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. गतवर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१५ मध्ये १४ हजार ७५४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यंदा विद्यार्थी संख्या १३ हजार ६५७ एवढी झाली आहे. बालवाडीत ३ हजार ३४१ एवढे विद्यार्थी असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. मनपात शिक्षकांची ५०८ पदे मंजूर असून, ४६७ शिक्षक कार्यरत आहेत. तासिका तत्त्वावर ४६ व १५० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. दहा इमारती भाडेतत्त्वावरशहरात मागील ३० ते ३५ वर्षांपासून मनपा नागरिकांना शैक्षणिक सेवा देत आहे. मनपाच्या मालकीच्या ६० इमारती आहेत. आजही दहा शाळा भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. लाखो रुपये भाडे दरमहा मनपा प्रशासन देत आहे. आजपर्यंत मनपा जेवढे पैसे भाडे खर्चात टाकते, त्यामध्ये १० नवीन इमारती तयार झाल्या असत्या. या उधळपट्टीला प्रशासनही लगाम लावण्यास तयार नाही. दरवर्षी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये मनपाला प्राप्त होतात. हा निधी जातो तरी कोठे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर...
By admin | Published: May 21, 2016 12:03 AM