फुलंब्री : तालुक्यातील तीन गावात आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी दिवसभरात कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ७७ जणांची तपासणी करण्यात आली असून, सगळ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यावरून तालुक्यातील बाधितांची संख्या घटू लागल्याचे समोर आले आहे.
आरोग्य विभागच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करून निदान केले जात आहे. प्रत्येक गावात कोरोना चाचणी शिबिर घेतले जात आहे. या तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाददेखील मिळत आहे. सोमवारी बोधेगाव बु, पिंपळगाव गांगदेव, शेवता, कान्होरी येथे तपासणी शिबिर घेण्यात आले. यात कान्होरी गावात एकही तपासणी झाली नाही. परंतु उर्वरित तीन गावांत ७७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे एका अर्थाने तालुक्यातील बाधितांची संख्या कमी होत असल्याचे हे संकेत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. शिबिरांच्या यशस्वीतेसाठी डॉ. सचिन पवार, डॉ. सारिका निकाळजे, डॉ. जगदीश सावंत, डॉ. बेनजीर शेख, डॉ. सीमा कुलकर्णी, कर्मचारी विष्णू काळे, करिष्मा चव्हाण, बालाजी गुट्टे, सुनील बहुरे, सविता जाधव, शिवनाथ तावडे यांनी परिश्रम घेतले.
रुग्णसंख्येला लागला ब्रेक
ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर तालुक्यातील बाधितांची संख्या घटू लागली आहे. त्यापूर्वी तालुक्यात दररोज २५ ते ३० बाधितांची संख्या असायची. कडक निर्बंधामुळे अनेक उपाययोजना राबविल्या. संक्रमणाची साखळीदेखील ब्रेक झाली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात चार ते पाच रुग्ण आढळून येत आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले यांनी सांगितले.