क्रांती चौक ठाण्याचे दुय्यम निरीक्षक अमोल देवकर, उपनिरीक्षक जी. पी. सोनटक्के आणि अन्य कर्मचारी मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून नाकाबंदी करीत होते. यावेळी तेथेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक तैनात होते. ११:३० वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकीस पोलिसांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. तेव्हा दुचाकीचालक तरुणीने गाडी न थांबविता वळून त्या राँग साइडने जाऊ लागल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखले आणि तुम्ही राँग साइडने जात असल्यामुळे तुम्हाला पावती घ्यावी लागेल, असे बजावले. याचा प्रचंड राग आल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेने तुम्ही आम्हालाच का रोखले, तुम्हाला दुसरे वाहनचालक दिसत नाही का, असे म्हणून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक देवकर आणि उपनिरीक्षक सोनटक्के यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्या घाटीत नर्स असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ओळखपत्र दाखवा, असे म्हटल्याचा त्यांना राग आला. त्यांनी पोलिसांनाच तुमचे नाव काय, असे विचारण्यास सुरुवात केली. नर्स असल्याने तुम्हाला आम्ही सोडतो. तुम्ही जा असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले आणि महिला कॉन्स्टेबल खरात यांना त्यांना जाऊ देण्यास सांगितले. यामुळे त्या दोघी निघाल्या आणि पुढे जाऊन थांबल्या व परत आल्या. महिला कॉन्स्टेबल खरात यांचे छायाचित्र मोबाइलमध्ये काढू लागल्या. हा काय प्रकार आहे, असे विचारल्यावर त्यांनी पुन्हा त्यांच्यासोबत हुज्जत घातल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.
चौकट
समज देऊन सोडले
ठाण्यात नेल्यावर त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. हवालदार खरात यांनी नर्सविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंदविली. गुन्हा नोंद होत असल्याचे लक्षात येताच त्या शांत झाल्या. पोलीस निरीक्षक दराडे यांनी त्यांना समज दिल्यावर त्यांना सोडून दिले.