२०१९ ला राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जुलै २०१९ पासून बालकांची काळजी घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नियमित पोषण आहारासह आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस अंडी, दूध, केळी, गूळ शेंगदाणे असा पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना दिला गेला. यासाठी शाळेला प्रतिदिन प्रतिविद्यार्थी ५ रुपये मिळणार होते. शाकाहारी विद्यार्थ्यांना अंड्यांऐवजी फळे देण्यात आली. यानंतर नोहेंबर २०१९ ला दुष्काळी परिस्थिती हटल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पैठण शहरातील १८ शाळांतील विद्यार्थ्यांना जुलै ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान मुख्याध्यापकांनी उधारीवर स्थानिक व्यापाऱ्यांकडून या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांना पोषक आहार खाऊ घातला होता. मात्र याबाबतचे पेमेंट शाळेला अद्याप न मिळाल्याने पुरवठादारांनी तगादा लावला आहे. यामुळे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले.
पोषण आहाराचे पैसे थकले, पुरवठादारांचा मुख्याध्यापकांकडे तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:04 AM