छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलाॅन मांजाने नागरिक जखमी होण्याच्या घटना सुरूच आहेत. अचानक मांजा आल्याने दुचाकीस्वार तरुणाच्या डोळ्याच्या खालील भागापासून कानापर्यंतचा भाग कापला गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी चंपा चौक परिसरात घडली. तरुणाने हाताने मांजा अडविल्याने सुदैवाने डोळा वाचला. मात्र, डोळ्याखालील भागात तब्बल १७ टाके द्यावे लागले. याच ठिकाणी अन्य एका दुचाकीचालकाचा कान कापला गेल्याचे जखमी तरुणाने सांगितले.
मोहम्मद ईमाद (२७, रा. नंदनवन काॅलनी) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. मोहम्मद ईमाद हे चुलत भाऊ बिलाल काझी यांच्यासह दुचाकीवरून चंपा चौक परिसरातून जात होते. मोहम्मद ईमाद दुचाकी चालवित होते. तर, बिलाल काझी हे मागे बसले होते. काही कळण्याच्या आतच त्यांच्यासमोर मांजा आला. त्यांनी त्याला हाताने दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्षणात त्यांच्या नाकाचा वरील भाग आणि उजव्या डोळ्याखालील भागापासून तर कानापर्यंतचा भाग कापला गेला. त्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना रिक्षातून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोळ्याखालील भागात १७ टाके पडले. रुग्णावर उपचार करण्यात आले असून, दाखल करण्याची गरज पडली नाही, असे नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अर्चना वरे यांनी सांगितले.
चुलत भाऊ बचावलेमांजा समोर येताच मोहम्मद ईमाद यांनी दुचाकीवर पाठीमागे बसलेले चुलत भाऊ बिलाल काझी यांना खाली वाकण्यास सांगितले आणि चेहऱ्यावर आलेला मांजा हाताने दूर केला. त्यामुळे बिलाल बचावले.
इतर लोक जखमीमाझ्यापाठीमागून येणाऱ्या अन्य एका दुचाकीचालकाचा कान कापला गेला, परंतु ते माझ्यासोबत उपचारासाठी घाटीत आले नाहीत. त्यांना रिक्षातून उपचारासाठी अन्यत्र नेण्यात आले. इतर काही लोकही किरकोळ जखमी झाल्याचे मोहम्मद ईमाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तरुणाचा गळा कापला, ८ टाकेनारेगाव येथून घरी परतणाऱ्या एका तरुणाचा नायलाॅन मांजाने गळा कापल्याची घटना रविवारी घडली. या तरुणाच्या गळ्याला ८ टाके पडले. सय्यद सोहेल (रा. लोटाकारंजा) असे गळा कापलेल्या तरुणाचे नाव आहे. सोहेल हे नारेगाव येथून लोटाकारंजा येथे दुचाकीवर येत होते. यावेळी कटकट गेट परिसरात पतंगाच्या मांजाने गळा कापला गेला.
आतापर्यंत ४ घटनाशहरात गेल्या ५ दिवसांत मांजामुळे जखमी होण्याच्या ४ घटना समोर आल्या आहेत. नायलाॅन मांजाला मिळणारी ‘ढील’ पाहता ही संख्या आगामी कालावधीत आणखी वाढण्याची भीती आहे.
नायलॉन मांजा विक्री रोखावीमुलाचा डोळा थोडक्यात बचावला. याबाबत जिन्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार देण्यासाठी आम्ही जाणार आहोत. नायलॉन मांजा विक्री रोखणे गरजेचे आहे.- मोहम्मद अब्दुल वाजेद, जखमी तरुणाचे वडील