छत्रपती संभाजीनगर : माणसांसह जनावरे, पक्ष्यांसाठी हानिकारक असलेल्या चायनीज म्हणजेच नायलॉन मांजा विकणाऱ्यांचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांत चार विक्रेत्यांवर छापा टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, यात चक्क पुस्तक विक्रेते व टेक्निशियनने देखील मांजा विक्री सुरू केल्याचे उघडकीस आले.
जानेवारीत संक्रांत असली तरी नोव्हेंबरपासूनच सर्वत्र पतंग उडवण्यास प्रारंभ होतो. आबालवृद्धांपासून लहानांपर्यंत पतंग उडवले जातात. मात्र, यात एकमेकांचे दोर कापण्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्याचे प्रमाणही अधिक असते. गेल्या दीड महिन्यात शहरात नायलॉन मांजामुळे सहा नागरिक गंभीर जखमी झाले. यात एका तरुण क्रिकेट खेळाडूचा देखील समावेश आहे. गत वर्षी उच्च न्यायालयाने नायलाॅन मांजा विक्रीवरून पोलिसांसह महानगरपालिकेला खडे बोल सुनावले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा शहर पोलिसांनी डिसेंबर महिन्यातच शोध मोहिमेस प्रारंभ केला आहे.
बुक स्टोअर अन् मांजा विक्रीगुन्हे शाखेने मंगळवारी मयूर पार्कमधील बुक स्टोअर्सवर छापा मारला. त्यात राहुल बाबासाहेब औताडे (रा. म्हसोबानगर) हा नायलॉन मांजा विक्री करताना सापडला. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी चार चक्री मांजा जप्त केला. दुसऱ्या कारवाईत बजाजनगरमध्ये गणेश राजूसिंग चंदेल (रा. सिंधी कॉलनी) व किशोर उणे (रा. रोहिदासपुरा) यांना घातक मांजा विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण ६० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. चौथ्या कारवाईत सिटी चौक पोलिसांनी शाहगंज भागात मांजा विकण्यासाठी आलेल्या सय्यद खिजरोद्दीन सय्यद सिराजोद्दीन (२३, रा. नवाबपुरा) याला ताब्यात घेतले. टेक्निशियन असलेल्या खिजरोद्दीनकडे मांजाचे १० माेठे बंडल सापडले. याप्रकरणी अनुक्रमे हर्सूल, एमआयडीसी वाळूज व सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.