औरंगाबाद : धोकादायक नायलॉन मांजाच्या वापरावर व विक्रीवर पूर्ण बंदी असतानाही कैसर कॉलनीत त्याची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गोडावूनवर छापा टाकून ६.४९ लाख रुपयांचा मांजा जप्त करून व्यापारी व त्याच्या नोकराला ताब्यात घेतले. व्यापारी कदीर अहमद नजीर अहमद (वय ४९, रा. रणमस्तपुरा, राजाबाजार रोड) आणि, तर तौसिफ खान इद्रीस खान (३२, रा. शाहबाजार) असे त्यांच्या नोकराचे नाव आहे. या दोघांविरुद्ध सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, तौसिफ खान हा नायलाॅन मांजा घेऊन शहागंजला जाणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने शहागंज पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून तौसिफला पकडले. त्याच्याजवळ मांजाची पेटी सापडली. त्याने सांगितले की, तो कदीर अहमद यांच्या बरेली काईट ट्रेडर्स (राजाबाजार) या दुकानात नोकर आहे. कदीरच्या सांगण्यावरून त्याने कैसर कॉलनीतील कदिर यांच्या गोडावूनमधून हा मांजा आणला होता.
पोलिसांनी तौसिफला सोबत घेऊन शुक्रवारी रात्रीच कैसर कॉलनीतील गोदामावर छापा टाकला. तेथे ६ लाख ४९ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. यानंतर तौसिकसह कदिर अहमदला पोलिसांनी ताब्यात घेत दोघांविरुद्ध सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक आघाव, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार नजीरखाँ पठाण, योगेश नवसारे, अश्वलिंग होनराव, धर्मा गायकवाड, के. के. अधाने, मंगेश हरणे, नितीन देशमुख, सुनील पवार, दत्ता दुभाळकर, राजाराम वाघ, प्राजक्ता वाघमारे, आदींनी यशस्वी केली.
पोलिसांचे आवाहनग्रामीण पोलिसांनी २३ पथके तयार केली, तर शहर पोलिसांनीही मांजाविरोधात मोहीम सुरू केली असून, विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देत नायलाॅन मांजा विक्रीची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. घातक मांजा विक्री, वाहतूक, साठा किंवा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.