छत्रपती संभाजीनगर : कर्तव्यावर निघालेल्या पीएसआयचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सचिन पारधे हे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले होते. सुधाकर नगर मधून जात असतानाच अचानक मांजाने त्यांचा गळा कापला गेला. स्थानिकांनी धाव घेत त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता.
तातडीने शस्त्रक्रिया शहानुरमिया दर्गा परिसरातील एका खाजगी रुग्णालयात पारधे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. घटनेची माहिती कळतच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी रुग्णालयात धाव घेतली.
३१ गुन्हे तरीही मांजा सुसाटशहर पोलिसांनी गेल्या दीड महिन्यांमध्ये ३१ गुन्हे दाखल करत ४०० पेक्षा अधिक रील जप्त केल्या. मात्र तरीही शहरात सोशल मीडिया व ऑनलाइन वेबसाईट वरून नायलॉन मांजा खरेदी करण्यात आला. या बेजबाबदार नागरिकांमुळे जवळपास ४० पेक्षा अधिक नागरिक आत्तापर्यंत गंभीर जखमी झाले आहेत.