औरंगाबाद : स्पर्धा परीक्षा वेळेवर घ्याव्या, इंधन दर कमी करून महागाई पासून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विद्यापीठ गेटसमोर सत्यशोधक विद्यार्थी संघटना, ‘एसएफआय’, सम्यक विद्यार्थी आंदोलन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआय, ऑल इंडिया पँथर सेना व समता कला मंच या संघटनांनी संयुक्तपणे हे आंदोलन केले. देशात पेट्रोल, डिझेल पाठोपाठ, गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे महागाई वाढून सर्वसामान्य जनता अतिशय हलाखीत जीवन कंठीत आहे. दुसरीकडे, अनेक वर्षांपासून नोकरभारती बंद असल्याने युवकांमध्ये नैराश्येची भावना पसरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य जनता आणि युवकांना दिलासा द्यावा. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेण्यात याव्यात, अनेक वर्षांपासून बंद असलेली प्राध्यापक भरती सुरु करावी, विविध विभागांतील रिक्त पदे तत्काळ भरावीत, इंधनदर वाढ मागे घ्यावी, आदी मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केले आहे.
या आंदोलनात लोकेश कांबळे, अमोल खरात, प्रकाश इंगळे, निलेश आंबेवाडीकर, निशिकांत कांबळे, दिपक पगारे, सुरेश सानप, अविनाश सिताफळे, स्वाती चेके, निषा नरवडे, किरण बनसोडे, सत्यजीत म्हस्के, नितीन वाहूळ, राहूल खंदारे, जयश्री शिर्के, अक्षदा शिर्के, अनिल दीपके, अमोल घुगे, भीमराव वाघमारे, अमोल दांडगे, अमित कुटे, सचिन बोराडे, दादाराव कांबळे, दीक्षा पवार, पांडूरंग भूतकर, योगेश बहादूरे, राहुल मकासरे, केशव नामेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोस्टर आणि घोषणांनी लक्ष वेधलेविद्यापीठ प्रवेशद्वारावर झालेल्या या निदर्शनात विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारे पोस्टर आणले होते. तसेच विद्यार्थ्यांनी सध्या व्हायरल असलेल्या 'ओ शेठ...' या गाण्यावर 'ओ शेठ, तुम्ही महागाई, बेरोजगारी वाढवली थेट' ही घोषणा लक्षवेधी ठरली. 'केद्र सरकार इंधन दरवाढ मागे घ्या', 'युवकांना रोजगार द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.