छत्रपती संभाजीनगर : सध्या महाराष्ट्रात शांतता रॅलीच्या नावाखाली वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी रविवारी केला.
सकल ओबीसी समाजाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नवनाथ वाघमारे हेही उपस्थित होते. हाके म्हणाले की, राजकीय व सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट धरला आहे. सगेसोयरे ही संकल्पना संवैधानिक नाही, अशा प्रकारे कुठल्याही कोर्टाचे जजमेंटसुद्धा उपलब्ध नाही.
सुप्रीम कोर्टासह विविध आयोगांनी व समित्यांनी मराठा समाजाला मागास ठरवलेले नाही. त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नवनाथ वाघमारे म्हणाले, मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा मनोज जरांगे हे करत आहेत. मंडल आयोग लागू होण्याचा इतिहास त्यांनी अगोदर पाहावा. मंडल आयोग हा संपूर्ण देशासाठी लागू केला आहे. मराठा समाज सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकला नाही. उगाच झुंडशाही करण्यात अर्थ नाही, असे ते म्हणाले.