पैठण : व्यवसायाच्या अनुषंगाने दररोज अनेकांशी संपर्क येत असल्याने व्यापारीबांधवांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज व्यापारी महासंघासोबत झालेल्या बैठकीत केले. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करू, टेस्टही करू; परंतु लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी बैठकीत मांडली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाच बांधला जात आहे, तर दुसरीकडे अनलॉक झाल्यानंतर सर्व दुकाने सुरू झाली आहेत. खरेदीसाठी बाजारपेठेत दररोज मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पैठण तहसील कार्यालयात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी महासंघाची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक किशोर पवार, मुख्याधिकारी संतोष आगळे, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, स्व. नि. भगवान कुलकर्णी, गणेश शर्मा, जनार्दन दराडे, दत्ता निलावाड, कमल मनोरे यांची उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठरावीक कालावधीनंतर व्यापाऱ्यांनी व दुकानातील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे गरजेचे असून, व्यापाऱ्यांनी अशी टेस्ट करून सर्टिफिकेट दर्शनी भागात लावावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले. सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, दुकानात गर्दी होऊ देऊ नये, ग्राहकांना मास्कशिवाय प्रवेश देऊ नये, अशा सूचना मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिल्या. बैठकीसाठी व्यापारी महासंघाचे कल्याण बरकसे, राजेंद्र रोहरा, गणेश कोळपकर, पवन लोहिया, बळराम लोळगे, मधुसूदन मुंदडा, विशाल पोहेकर, संदीप सारडा आदींसह व्यापारी बांधव उपस्थित होते.
पैठण तालुक्यातील निर्बंध हटवा
पैठण तालुक्यात कोरोना रेट कमी असल्यामुळे औरंगाबाद शहराप्रमाणे पैठण तालुक्यात १०० टक्के अनलॉक करून सर्व निर्बंध हटविण्यात यावेत, अशी मागणी व्यापारी महासंघाचे पवन लोहिया यांनी बैठकीत केली. यास उपस्थित व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.