औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्यास प्रचंड विलंब झाला. मराठवाड्यासह राज्यातील सर्वच मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच घोषित झाले. मात्र, औरंगाबादचा निकाल जाहीर होण्यास सायंकाळचे ७ वाजले. केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांमुळे हा निकाल लांबल्याचे अधिकार्यांनी खाजगीत बोलताना सांगितले. औरंगाबाद मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत घोषित होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया अतिशय संथ सुरू राहिली. त्यामुळे संपूर्ण मतमोजणीस तब्बल ११ तास लागले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी ७ वाजता संपली. एकूण २१ फेर्या झाल्या. प्रत्येक फेरीसाठी १० मिनिटे लागतील, असा हिशेब करून चार ते साडेचार तासांत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्ष सायंकाळचे ७ वाजले. त्यामुळे मोजणी कर्मचारी, उमेदवार, त्यांचे मोजणी प्रतिनिधी, पत्रकार, कार्यकर्ते, बंदोबस्तावरील पोलीस, अशा सगळ्यांची गैरसोय झाली. ११ तास थांबावे लागल्यामुळे सगळेच अक्षरश: कंटाळून गेले. दुपारी एकनंतरच बाहेर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. कडक ऊन आणि केंद्राबाहेरील अपुरी व्यवस्था, यामुळे उशीर होत होता, तसे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. अखेर सायंकाळी ७ वाजता निकाल जाहीर झाला. मराठवाड्यातील आणि राज्यातील इतर सर्व मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच जाहीर झाले होते. राज्यात सर्वात शेवटचा निकाल औरंगाबादचा ठरला. दरम्यान, केंद्रीय निवडणूक निरीक्षक शालिनी मिश्रा यांनी दिलेल्या सूचनांमुळेच प्रक्रिया लांबल्याचे अधिकार्यांनी खाजगीत सांगितले. मिश्रा यांनी पहिल्या फेरीची आकडेवारी घोषित केल्याशिवाय दुसर्या फेरीची मोजणी करायची नाही, अशा सूचना दिल्या. त्यामुळेच प्रत्येक फेरीनंतर पुढील फेरीची मोजणी सुरू होण्यास पाच सहा मिनिटांचा अवधी जात होता. परिणामी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपण्यास सहा तासांचा अवधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमकुमार यांना विचारले असता त्यांनी मात्र, वेगळेच कारण सांगितले. मतमोजणीसाठी आम्ही आकडेवारी नोंदविण्याकरिता कॉम्प्युटराईज व्यवस्थेबरोबरच मॅन्युअली (हाताने नोंद करणे) व्यवस्थाही केली होती.
निरीक्षकांनी पाहिला अंत
By admin | Published: May 17, 2014 1:09 AM