औरंगाबाद : ‘लोकमत’च्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सकाळी लोकमत भवनात परिवाराचा स्नेह सोहळा रंगला. मागील चार दशकांचा खडतर प्रवास, संघर्ष, आव्हानाच्या कटु गोड आठवणींना लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी दिलेल्या उजाळ्यामुळे सर्वच भारावून गेले. ‘वृत्तपत्रसृष्टीमध्ये ‘लोकमत’ने यशाचे सर्वोच्च शिखर हे वाचकाच्या पाठबळावर आणि लोकमत परिवाराच्या परिश्रमाने गाठलेय. ‘उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका’,असा सल्ला देत यापुढेही अथक परिश्रम घेऊन ‘लोकमत’चा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करु यात, असा संकल्प ही त्यांनी सर्वांच्या साक्षीने सोडला.
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सकाळी कौटुंबिक सोहळ्याची सुरूवात झाली. कार्यकारी संचालक करण दर्डा, संपादक नंदकिशोर पाटील, चक्रधर दळवी, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सरव्यवस्थापक प्रवीण चोपडा, उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारी, उपाध्यक्ष (एचआर) बालाजी मुळे, शैलेश चांदिवाल, डॉ. खुशालचंद बाहेती, सतीश बंब, अशोक भंडारी, लोकमत समाचारचे संपादक अमिताभ श्रीवास्तव, लोकमत टाइम्सचे संपादक योगेश गोले, स.सो. खंडाळकर आदींसह संपादकीय, वितरण, जाहिरात व मनुष्यबळ विकास विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी राजेंद्र दर्डा म्हणाले, ‘लोकमत’ला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक अडचणी, आव्हाने आणि संकटावर मात करीत ‘लोकमत’ आज इथपर्यंत पोहोचला आहे. हे यश एका व्यक्तीचे नसून त्या काळात आणि या काळातही अखंड परिश्रम, त्याग आणि निष्ठा असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. लोकांचे प्रेम आणि साथ असेल, तर वृत्तपत्र यशस्वी होईल, ही ‘लोकमत’चे बीजारोपण करणारे बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांची शिकवण आपण सत्यात उतरवू शकलो. बाबूजींची प्रेरणा घेऊन आम्ही संतांच्या या भूमीत आलो. मोठे बंधू विजय दर्डा यांची साथ मिळाली आणि तुमच्या सर्वांच्या परिश्रमाचे हे फळ आहे. देवेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, करण दर्डा या नव्या पिढीने सर्वांना सोबत घेऊन नव्या तंत्रज्ञानाची वाट धरली. पहिले संपादक म.य. उर्फ बाबा दळवी, संतोष महाजन, विंग कमांडर टी.आर. जाधव, विश्वास कानिटकर, उत्तम जैन यांच्यासह सर्वच संपादकीय, वितरण व वसुली विभागातल्या सहकाऱ्यांच्या कार्याची त्यांनी यावेळी आठवण काढली. सर्व वाचक, वार्ताहर, जाहिरात, एजंट, हितचिंतकांचे राजेंद्र दर्डा यांनी आभार मानले. वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील तमाम वाचक, हितचिंतकांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनी व समाज माध्यमावरून लोकमतवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केला.