छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील मनेगाव शिवार ते कन्नड तालुक्यातील कानडगावात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने दीड तासात दोन दरोडे घातले. त्यानंतर पोलिसांवर शस्त्रांनी हल्ला केला. यात तीन पोलिसांसह प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर गंभीर जखमी झाला. शुक्रवारी यात दहा दरोडेखोर निष्पन्न झाले असून ते दहा वर्षे गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्यावर ३२ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मनेगाव शिवारातील विष्णू सुराशे व कानडगावात काकासाहेब नलावडे यांच्या शेतवस्तीवर दरोडे टाकले. सागर भोसले (२०) व रावसाहेब पगारे (३५), शाम भोसले (२७), पांडुरंग उर्फ भारंब भोसले (२६), धीरज भोसले, परमेश्वर काळे (२२), अजय काळे, शंकर भोसले, भगीरथ भोसले, अमित ऊर्फ अमीनखान कागद चव्हाण (२३) या कुख्यात गुन्हेगारांनी प्राणघातक हल्ला करून लूटमार केली. शिऊर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने त्यांचा तपास सुरू केला. बोरसर फाट्यावर मध्यरात्री २.३० वाजता पोलिसांनी गाडी अडवून सागर व रावसाहेब याला पकडले. मात्र, अन्य सहा जणांनी हल्ला करून पोबारा केला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता जानेफळ शिवारात पोलिस व दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत व वाल्मीक निकम यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा अमीन पोलिसांच्या गोळीने गंभीर जखमी झाला.
गुरुवारी प्राथमिक माहितीत ८ दरोडेखोर असल्याचे कळाले होते. मात्र, शुक्रवारी १० जणांच्या टोळीने हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. २०१४ पासून ही टोळी गंभीर मारहाण, लूटमार, दरोड्यासाठी कुख्यात आहे. कोपरगावच्या पडेगावात त्यांचे वास्तव्य असते. यातील अजय, भगीरथ, अमित, शंकरवर खुनाचेही गुन्हे दाखल असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगितले.
कोणावर किती गुन्हे ?सागरवर ४, रावसाहेबवर १, शामवर ६, पांडुरंगवर ३, धीरजवर १, अजयवर १, शंकरवर ५, भगीरथवर ४ तर अमितवर ६ गुन्हे दाखल आहेत. परमेश्वर पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आला आहे. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पसार दरोडेखोरांचा शोध सुरू असल्याचे अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सांगितले.