छत्रपती संभाजीनगर : नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हल्समध्ये ६४ वर्षीय वृद्धाने २२ वर्षीय तरुणीसोबत आक्षेपार्ह कृत्य केले. त्यामुळे तरुणीला झोपेतून जाग येताच तिला संताप अनावर झाला. तिने तत्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करून जालन्यावरून शहरात येत बस थेट एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नेली. तिच्या तक्रारीवरून याप्रकरणी मंजित भागसिंग अहलुवालिया (६४, रा. नागपूर) वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अभियांत्रिकीची विद्यार्थी असलेली २२ वर्षीय तरुणी पुण्यात वास्तव्यास असते. एका परीक्षेसाठी ती २८ एप्रिल रोजी नागपूरला गेली होती. रात्री तिने प्रसन्ना पर्पल ट्रॅव्हल्सद्वारे नागपूर-पुणे प्रवास सुरू केला. तिच्या शेजारच्या सीटवर मंजित होता. १ वाजता तरुणीला स्पर्श होत असल्याचे जाणवले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळाने जालन्याच्या आसपास तिला पुन्हा पायाला स्पर्श झाला. मंजितकडून जाणीवपूर्वक स्पर्श होत असल्याचे जाणवल्याने तिने थेट चालकाला बस थांबवण्यास सांगितले. गाढ झाेपेत असलेले अन्य प्रवासी देखील यामुळे जागे झाले. त्यानंतर तिने कुटूंबाला हा प्रकार कळवून थेट छत्रपती संभाजीनगर पोलिस नियंत्रण कक्षाला संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनाक्रम समजून घेत एमआयडीसी सिडको पोलिसांना घटनेची दखल घेण्याची सूचना केली.
एमआयडीसी सिडकोचे सहायक फौजदार दशरथ जाधव यांनी तत्काळ मुलीला संपर्क केला. सहकाऱ्यांसह ते विमानतळाजवळ बसची वाट पाहत होते. पहाटे ४ वाजता बस शहरात आल्यानंतर सर्व प्रवाशांसह बस पोलिस ठाण्यात नेण्यात आली. जाधव यांनी दोघांसह सहप्रवाशांकडे चौकशी केली. परंतु, अन्य प्रवाशांनाही उशीर होत असल्याने मुलीने पुण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याबाबत लिहून दिले. मंजित यांनी देखील पोलिसांसमोर कृत्य केल्याचे नाकारले. तिने मुलीला चुकीने स्पर्श झाल्याचे सांगत विनवण्या केल्या. तरुणी मात्र तक्रार देण्यावर ठाम होती. पुण्यात गेल्यावर तिने गुन्हा दाखल केला. १ मे रोजी तेथून तो एमआयडीसी सिडको ठाण्यात वर्ग करण्यात आला. सहायक फौजदार विष्णू मुंढे अधिक तपास करत आहेत.