छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सोशल मिडीयातील एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणे शहरातील 'सीए'ला चांगलेच महागात पडले. हा प्रकार निदर्शनास येताच भाजप पदाधिकाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी सुत्रे हलवत काही तासांत त्याला ताब्यात घेतले. अतिष ओमप्रकाश काबरा (३५, रा. नरहरी वसंत विहार, न्यु एसबीएएच कॉलनी, ज्योतीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
अमृता फडणवीस सोशल मिडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर सक्रिय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील लाखांमध्ये आहे. अनेक घटना, घडामोडी, सण आदींवर तो त्या व्यक्त होत असतात. माध्यमांमध्ये त्यांच्या अनेक पोस्टची दखल घेतली जाते. परंतू त्यांच्या एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणे शहरातील 'सीए' ला थेट पोलिस ठाण्यात घेऊन गेल्याचा प्रकार शहरात समोर आला. ३० जून रोजी अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर अतिषने आक्षेपार्ह कमेंट केली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना प्रकार कळवला. सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांना त्यांच्याकडून हा प्रकार कळताच त्यांनी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध सुरू करत लागलीच ताब्यात घेतले. पालोदकर यांच्या फिर्यादीवरुन अतिषवर भादवी २९२, ५०९ सह क. ६७, ६७ (अ) आयटी अॅक्ट २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे अतिष सीए असून उच्चशिक्षित आहेत. शुक्रवारी आम्ही त्यास ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. शिवाय, ट्विटवरील आक्षेपार्ह कमेंट देखील हटवण्यात आली आहे. सोशल मिडियाचा वापर करताना नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. पोलिसांचे तेथील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष आहे.- प्रविणा यादव, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.