औरंगाबाद : बालमित्रांच्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या चार जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या तरुणीने यासंदर्भात तक्रार दिली. अर्थ मुनिश देवपुरी, रितेश जाधव, अंकित अविनाश छकडी आणि आदित्य राजू पवार, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार आणि आरोपी हे बालमित्र आहेत. तक्रारदार या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या बालमित्रांचा व्हाट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर आरोपी तरुण नोव्हेंबर २०२० पासून धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सतत शेअर करत आहेत. तक्रारदार यांनी त्यांना अनेकवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांना दाद दिली नाही. अनेकदा सांगूनही ते आक्षेपार्ह पोस्ट शेअर करतच राहिल्यामुळे शेवटी तक्रारदार यांनी सोमवारी त्यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक डॉ. जी.एच. दराडे हे तपास करीत आहेत.