औरंगाबाद : येथे आरोग्य भवन म्हणजे आरोग्य उपसंचालक कार्यालय आहे. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांवर करडी नजर राहील, समस्या निकाली निघून रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळणे अपेक्षित होते; परंतु आरोग्याच्या प्रश्नांसाठी या कार्यालयाकडून मनपा, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयाकडेच बोट दाखविले जाते. त्यामुळे आरोग्य उपसंचालक कार्यालय जिल्ह्यासाठी पांढरा हत्ती ठरत असल्याची ओरड होत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी आरोग्य भवनची इमारत उभारण्यात आली. याठिकाणी हिवताप, कुष्ठरोग, हत्तीरोग आदी कार्यालये आहेत. औरंगाबादसह जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे या कार्यालयांतर्गत आहेत. मुख्य कार्यालय औरंगाबादेत असल्याने किमान जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची करडी नजर असणे अपेक्षित आहे. मात्र, कागदोपत्रीच कारभार सुरू असल्याची स्थिती आहे. शहरातील आरोग्य प्रश्नांसाठी मनपा आणि ग्रामीण आरोग्याच्या समस्यांसाठी जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयावर जबाबदारी ढकलून अधिकारी मोकळे होत आहेत. खेड्यापाड्यातून उपचारासाठी शहरात येणे, बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ, आरोग्य केंद्रांची दुरवस्था याकडे लक्षही जात नाही.
स्वत:चा प्रश्न सोडविण्यात अपयश
मराठवाडा विकास पॅकेजअंतर्गत आरोग्य उपसंचालक कार्यालयाची इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी दोन कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर होऊन देण्यात आला. आरोग्य उपसंचालक कार्यालयाशेजारील जागेवर तीन मजली इमारत उभारणीचा आराखडा मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात दोनच मजले उभे राहिले. तिसरा मजला अर्धवट राहिला. हा प्रश्नही सोडविण्यास येथील अधिकाऱ्यांना अपयश आले.
बॅक ऑफिस म्हणून जबाबदारी
आरोग्य उपसंचालक कार्यालय हे बॅक ऑफिस म्हणून जबाबदारी पार पाडते. फ्रंटलाइनवर जे काम करतात, म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, विनंती बदल्या, बांधकामाचे प्रस्ताव, १०८ रुग्णवाहिकासह विविध सेवासंदर्भात समन्वय साधणे, आलेल्या औषधी, सामुग्रींचे वाटप आदी कामे पार पाडली जातात. रुग्णसेवेसंदर्भातील तक्रारींचा जर संबंधितांकडून निराकरण होत नसेल तर आमच्याकडेही तक्रार करता येते.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक कार्यालय
फोटो ओळ..
शहरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाची इमारत.