औरंगाबाद : औरंगाबादेत लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जागेचा शोध आता संपला आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी शरणापूर शिवारातील भांगसीमाता डोंगराजवळील ३० एकर जागा (जमीन) देण्यात आली आहे. या जमिनीचा नकाशा आणि मार्किंगसह कागदपत्रे नुकतेच लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयास हस्तांतरण करण्यात आले आहेत.
नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाचे विभाजन करून औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत विविध मार्गावरील रेल्वेरुळावर १० पोलीस ठाणी कार्यरत आहेत. सुमारे साडेसहाशे मनुष्यबळ, ५२ पोलीस अधिकारी या कार्यालयाच्या अस्थापनेवर आहेत. लाेहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय स्थापना झाल्यानंतर हे कार्यालय सध्या ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील एटीएसच्या कार्यालयाच्या इमारतीत सुरू आहे. पहिले पोलीस अधीक्षक चंद्रकिरण मीना हे होते. त्यांनी आणि विद्यमान पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी या कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी महसूल प्रशासनाकडे ३० एकर जमिनीची मागणी केली होती.
विविध ठिकाणच्या उपलब्ध जागेची पाहणी केल्यानंतर शरणापूर शिवारातील भांगसीमाता गडाजवळील ३० एकर जमीन मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कलुबर्मे यांनी दिली. ते म्हणाले की, या जमिनीचा नकाशा आणि हद्द निश्चित करण्यात आली. आमच्या कार्यालयाच्या नावे या जमिनीचा सातबाराही तयार झाला आहे. जमीन प्राप्त झाल्यानंतर आता तेथे लोहमार्ग एस.पी. कार्यालयाची इमारत उभारण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळाकडून या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम होईल.
----------------
चौकट...
सध्या एटीएस कार्यालयाजवळील इमारतीत लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय सुरू आहे. ही इमारत अपुरी पडत होती. तेथे पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक विशेष शाखा, लोहमार्ग पोलीस स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नियंत्रण कक्षाचे कामकाज चालते. नवीन जागा मिळाल्यामुळे या कार्यालयास प्रशस्त इमारत उभी राहील. तेथे या कार्यालयांतर्गत विविध मोटारवाहन आदींसह विविध शाखांची कार्यालये एकाच छताखाली कार्यरत होतील.