औरंगाबाद : कोविड फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा मिळण्यासह विविध मागण्यांसाठी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी साेमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. परिणामी नव्या वीजजोडणीसह महावितरणचे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले. आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा, रुग्णालयांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, याची काळजी घेतली जात आहे.
कामबंद आंदोलन पुकारलेल्या वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघटना कृती समितीत सहा संघटनांनी सहभाग घेतला आहे. महावितरणच्या कार्यालयासमाेर सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणा दिल्या.
आंदोलन काळात हॉस्पिटल व इतर अत्यावश्यक सेवा यांनाच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु इतर अनेक कामे विस्कळीत झाली. प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनावर सबाॅर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनचे प्रादेशिक सचिव अविनाश चव्हाण, सहसचिव राजेंद्र राठोड, कामगार महासंघाचे कार्याध्यक्ष अरुण पिवळ, तुषार भोसले, वीज तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष कैलास गौरकर, सचिव श्रावणकुमार कोलनूरकर, ओरकर्स फेडरेशनचे पांडुरंग पठाडे, बी.एल. वानखेडे, इंटकचे प्रशांत साळुंके आदींची नावे आहेत.
..या आहेत मागण्या
१. वीज कामगार, अभियंते व अधिकारी व कंत्राटी कामगारांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा देणे.
२. वीज कामगार, अभियंते व अधिकारी व कंत्राटी कामगार व प्रशिक्षणार्थी व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रथम लसीकरण करणे.
३. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या वीज कामगारांना राज्य शासनाप्रमाणे ५० लाख रुपये अनुदान द्यावे.
४. कोविडचा उद्रेक पाहता वीजबिल वसुलीसाठी सक्ती करू नये.
-----
फोटो ओळ..
कामबंद आंदोलनादरम्यान घोषणा देताना संघटनेचे पदाधिकारी.