वाळूज महानगर : वडगाव पाझर तलावात प्लॉटिंक टाकली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या जिल्हा परिषदेतील सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.६) वडगाव तलावाला भेट देवून अतिक्रमित प्लॉटिंगची पाहणी केली.
सिंचन विभागाने १९७८ मध्ये वडगावात पाझर तलावासाठी येथील शेतकºयांच्या जमिनी घेतल्या. १५ हेक्टर ४४ आर जमीन तलावासाठी संपादित करुन १९८२ मध्ये तलावाचे काम पूर्ण केले. परंतू तलावाची हद्द निश्चित केली नाही.
दरम्यानच्या काळात तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुम चोरी व अतिक्रमण होत असल्याने स्थानिक ग्रामपंचायतीने तलावाची हद्द निश्चित करुन द्यावी म्हणून सिंचन विभागाकडे पत्रव्यवहार केला. परंतू ग्रामपंचायतीच्या या पत्राला सिंचन विभागाने दाद दिली नाही. त्यामुळे हद्दीचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. काहींनी चक्क तलावातच प्लॉटिंग टाकायला सुरुवात केली. या विषयी ‘लोकमत’ने पाझर तलावात टाकली जातेय प्लॉटिंग या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताने जि.प. सिंचन विभाग खडबडून जागी झाला.
शाखा अभियंता डी.डी. राठोड व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक डी.टी. काळे यांनी शुक्रवारी (दि.६) दुपारी ४ वाजेच्या सुमारास वडगाव तलावाला भेट देवून तलावातील अतिक्रमणाची पाहणी केली. लवकरच तलावाची मोजणी करुन हद्द निश्चित करण्यात येणार आहे. या मोजणीनंतर तलावाच्या हद्दीत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल. असे शाखा अभियंता डी.डी. राठोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.