नांदेड :जिल्हा परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यासंदर्भात सोमवारी दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन केले होते़ मात्र प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे जयंती नियोजनाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे़ आता ३० मार्च रोजी पुन्हा बैठक आयोजित केली आहे़ जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यासाठी बैठक घेण्यात आली़ बैठकीला उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिक्षण सभापती संजय बेळगे, सभापती दिनकर दहिफळे, सभापती स्वप्नील चव्हाण, सभापती वंदना लहानकर यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, प्रकल्प संचालक डॉ़ सुधीर भातलवंडे, मुख्य लेखाधिकारी राऊत यांची उपस्थिती होती़ परंतु ज्या विभागाकडून जयंतीच्या आयोजनासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे, त्या समाजकल्याण विभागाचे अधिकारीच बैठकीला हजर नव्हते़ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, प्रकल्प संचालक चाटे यांची अनुपस्थिती होती़ त्यामुळे महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत होवू शकले नाही़ यासंदर्भात जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीचे गांर्भीय लक्षात आले नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली़
नियोजन बैठकीस अधिकाऱ्यांची दांडी
By admin | Published: March 29, 2016 11:48 PM