छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या सातारा-देवळाईकरांची सोमवारी मध्यरात्री पडलेल्या जोरदार पावसाने त्रेधा उडविली. अनेक वसाहतींना पाण्याने वेढा घातला, तर परिसरातील सर्वच वसाहती दलदलीत रुतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी जबाबदार अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी चक्क दोन तास देवळाई चौकात साचलेल्या पाण्यात बसवून साहेब आता तुम्हाला कसे वाटतय? असा प्रश्न विचारला.
सातारा-देवळाईकरांचे हाल काही केल्या संपत नाहीत. अनेक वर्ष चिखलमय रस्ते तुडविल्यानंतर नुकतेच या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. परंतु आता जलवाहिनी टाकण्यासाठी ते रस्ते खोदल्याने पुन्हा चिखलमय झाले. काही जलवाहिन्या टाकण्यात आल्या परंतु खोदलेल्या नाल्या व्यवस्थित बुजविण्यात आल्या नाहीत. त्यात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला व मंगळवारी सकाळी नागरिकांना संताप अनावर झाला.
देवळाई चौकाला नदीचे रूप....प्रथमेशनगरी, माउलीनगर, राजनगर, दत्तमंदिरापासून तसेच देवळाई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कौसर पार्क व इतर कॉलनी सोसायटीतील नागरिकांना पावसामुळे अडचणीला तोंड द्यावे लागले. देवळाई चौकात रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने नागरिक संतापले. या परिस्थितीला कारणीभूत जलवाहिनी टाकण्याचे काम करणारी कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरचे महेश धुसे, बालेप्रसाद गुप्ता यांना नागरिकांनी बोलावून घेतले. तेथे साचलेल्या पाण्यात दोन तास त्यांना बसवून ठेवले.
का ओढवली अशी स्थिती?जलवाहिनी टाकल्यानंतर बाहेर आलेली माती, मलबा अस्ताव्यक्त ठेवून मजूर निघून जातात. घाईघाई व दर्जाहीन काम करून जनतेला का वेठीस धरता? असा सवाल नागरिकांनी जीव्हीपीआरचे महेश धुसे, बालेप्रसाद गुप्ता यांना विचारला. खोदकाम केलेले रस्ते व्यवस्थित करून द्या, अशी मागणी माजी उपमहापौर राजू शिंदे, उद्धव सेनेचे उपशहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे पाटील, नितीन झरे पाटील, दिनेश राजेभोसले, सचिन वाहुळ, शिवाजी बचाटे, सुरेश कसबे, सदानंद पांडे, शरद जोशी, श्रीधर हिवाळे, सागर निकम, शिवाजी हिवाळे, भारत हिवाळे आदी नागरिकांनी केली.