छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने परीक्षेतील नियोजन आणि व्यवस्थापनातील चुका सुधारण्यासाठी परीक्षा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची खांदेपालट केली; मात्र त्यानंतरही स्थिती बदललेली दिसत नाही. शनिवारी दुपारी वाणिज्य शास्त्राच्या परीक्षेत सोमवारी होणारा पेपर विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आला. वेळीच ही बाब लक्षात आल्यानंतर विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची चांगलीच भंबेरी उडाली.
झाले असे की, शनिवारी (दि. १) दुपारी द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा होती. गेल्यावर्षी अनुत्तीर्ण तसेच परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या या फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांना ‘आयटी बिझनेस ॲप्लिकेशन- १’ पेपर देण्याऐवजी सोमवारी होणारा ‘आयटी बिझनेस ॲप्लिकेशन- ३’ पेपर देण्यात आला. काही अवधीनंतर पेपर चुकीचा असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पर्यवेक्षकांकडे तक्रार केली. पर्यवेक्षकाने ही बाब केंद्र संचालकांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्र संचालकांनी तत्काळ विद्यापीठ परीक्षा विभागाशी संपर्क साधून ही मोठी चूक कळविली. परीक्षा विभागाने तत्काळ पेपर बदलून दिला. या सर्व घडामोडीत पाऊण तास होऊन गेला. दरम्यान, परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना तेवढाच वेळ वाढवून देण्याची संबंधित केंद्र संचालकांना सूचना केली.
१३४ केंद्रांवर डाऊनलोड झाले पेपरयासंदर्भात परीक्षा विभागाशी संपर्क साधण्यात आला असता, नामसाधर्म्यामुळे विभागातील संगणक ऑपरेटरकडून ही गंभीर चूक झाली, असे सांगण्यात आले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३४ परीक्षा केंद्रांवर शनिवारी दुपारी ‘आयटी बिझनेस ॲप्लिकेशन- ३’ हा सोमवारचा पेपर डाऊनलोड झाला. त्यानंतर तक्रारी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना लगेच पेपर बदलून देण्यात आला. एवढेच नव्हे, तर सोमवारचा ‘आयटी बिझनेस ॲप्लिकेशन- ३’ हा पेपर देखील बदलण्यात आला आहे.
पूर्वपरवानगीशिवाय बदलले केंद्रकन्नड तालुक्यातील एका संस्थेने शुक्रवारी विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय आपल्या दुसऱ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. विद्यापीठाने कोळेवाडी येथील स्व. गोविंदराव पाटील जिवरग वरिष्ठ महाविद्यालय हे परीक्षेचे केंद्र होते. याच संस्थेचे दुसरे महाविद्यालय औराळा येथे आहे. तेथे विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. पथकप्रमुखांनी यासंबंधीचा अहवाल विद्यापीठाला दिला. विद्यापीठाकडून यासंदर्भात नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे.