- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभाग म्हटला की, रुग्णालये आणि रुग्णसेवा ही कामे करणारा विभाग असे तुम्ही म्हणाल. मात्र, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या महिनाभरात शहरात तब्बल २४९ डास पकडले. हो... डासच पकडले. तुम्ही म्हणाल, डेंग्यू रोखण्यासाठी आता डास पकडण्याची मोहीम सुरू केली की काय? तर तसे काही नाही, तर पकडलेल्या डासांमध्ये कोणता रोग पसरविणाऱ्या डासांची संख्या अधिक आहे, हे पाहून त्यावरून आरोग्य विभागाची कामाची दिशा, धोरण व उपाययोजना ठरते. मात्र, ही बाब सर्वसामान्यांपासून अनभिज्ञ आहे.जुलैपासून शहराला डेंग्यूचा महाविळखा बसला. महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागालाही शहरातील रस्त्यांवर उतरावे लागले. ‘डेंग्यू’ पसरविण्यास ‘एडिस’ नावाचा डास कारणीभूत ठरतो.
‘एडिस’सह क्युलेक्स आणि अॅनफिलिस या प्रकारचे डास प्रामुख्याने आढळतात. क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग तर अॅनफिलिस डासामुळे हिवताप (मलेरिया) ची लागण होते. शहरात डेंग्यूची परिस्थिती पाहता कोणत्या प्रकारचे डास सर्वाधिक आहे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हिवताप विभागातर्फे डासांची घनता काढली जाते. ही घनता काढण्यासाठीच कर्मचाऱ्यांना डास पकडावे लागतात.
असे पकडतात डास?ज्या भागांत डास अळींचे प्रमाण आढळते, त्या भागात सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान डास पकडण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी अडीच तास दिला जातो. एक लांब प्लास्टिकची नळी डासाजवळ धरली जाते. नळीच्या दुसऱ्या टोकातून तोंडावाटे कर्मचारी हवा आतमध्ये ओढतात. नळीच्या दुसऱ्या टोकाला जाळी असते. त्यामुळे डास तोंडात येत नाही. पकडलेले डास परीक्षा नळीत घेतले जातात. त्यानंतर तो कोणता डास आहे, याचा शोध घेतला जातो.
८१ ‘एडिस’ डास२४९ डासांमध्ये ९१ क्युलेक्स डास आढळले. शहरात डेंग्यूचा उद्रेक पसरविणारे ‘एडिस’ प्रकारचे ८१ डास पकडण्यात आले. या डासांमुळे डेंग्यूबरोबर चिकुनगुनियाची लागण होते, तर ७७ अॅनाफिलिस डास पकडण्यात आले. शहरात जुलैपासून आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २८१ वर गेली आहे. हत्तीरोगाची रुग्णसंख्या ६८ आहे; परंतु ही संख्या अनेक वर्षांची असून, केवळ ९ रुग्ण नवीन असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
या भागांतून डास जेरबंद२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान विजयनगर, पडेगाव, जाधववाडी, घाटी निवासस्थान, चेलीपुरा, नारेगाव, रोशनगेट परिसर, संग्रामनगर, मिसारवाडी, खोकडपुरा, ज्योतीनगर, हिनानगर, आरेफ कॉलनी, एन-९, कैसर कॉलनी, मुकुंदवाडी भागांतून हे २४९ डास पकडण्यात आले.
उपाययोजना करण्यास मदतडास पकडून त्यातून डासांची घनता काढली जाते. आढळणाऱ्या डासांनुसार एखादा आजार वाढू शकतो का, याचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जातात. - डॉ. विनायक भटकर, सहायक संचालक (हिवताप), सार्वजनिक आरोग्य विभाग