लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील पुलाचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे, जुन्या पुलावरून दुचाकी, रूग्णवाहिका व इतर महत्वाच्या वाहनांना परवानगी देण्यात यावी, नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करावे, यासारख्या विविध मागण्यांसंदर्भात संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रातच धरणे आंदोलन करण्यात आले. सदरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक शहरातून वळविण्यात आली. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत आहे. हाच धागा पकडून आंदोलन करण्यात आले.दरम्यान, आंदोलन करत असताना स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री आणि प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. सदरील पुलाचे काम तात्काळ सुरू न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.या प्रसंगी संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, गंगाधर घुमरे, फारूक पटेल, आप्पा जगताप, बबन गवते, दिलीप भोसले, शिवाजी जाधव, हेमंत क्षीरसागर, अमर नाईकवाडे, युवराज जगताप, रमेश चव्हाण, भाऊसाहेब डावकर आदी उपस्थित होते.
जुन्या पुलावरून दुचाकी, रुग्णवाहिकेला परवानगी द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:58 AM