औरंगाबाद: जुन्या वादातून शेजाऱ्याच्या घरावर दगडफे करून दहशत निर्माण करीत मोपेड जाळून टाकण्यात आल्याची घटना हनुमाननगर येथे गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सचिन राजू वाघमारे, शैलेश राजू वाघमारे, निलेश राजू वाघमारे, राजू वाघमारे ,ऋषिकेश भिमराव शेवगे आणि वंदना राजू वाघमारे अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, हनुमाननगर येथील संदीप उत्तमराव साबळे आणि वाघमारे कुटुंब हे एकाच गल्लीत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात जोरदार धुसपूस सुरू आहे. या संदीप हे गुरूवारी सकाळीच कामानिमित्त झाल्टा फाटा येथे गेले होते आणि दिवसभर ते तेथेच होते. दरम्यान रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक सचिन वाघमारे, शैलेश, निलेश, राजू, ऋषिकेश आणि वंदना यांनी साबळे कुटुंबाला उद्देशून शिवीगाळ करीत त्यांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरवात केली.
यावेळी साबळे यांची पत्नी आणि मुले घरी होती. या दगडफेकीमुळे साबळे यांच्या घरातील सदस्य प्रचंड घाबरले आणि त्यांनी साबळे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. साबळे हे घरी येईपर्यंत आरोपींनी केलेल्या दगडफेकीमुळे त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या. एवढेच नव्हे गल्लीतील रिकाम्या भूखंडावर उभी करून ठेवलेली मोपेड क्रमांक (एमएच-२०एफए ३०२९) पेटवून दिल्याने जळून खाक झाली. रात्री सव्वा सात ते साडेसात वाजेच्या सुमारास साबळे हे घरी परतले तेव्हा त्यांना गाडी जळाली आणि घराच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसल्या.