औरंगाबाद : शिवसेनेला मराठवाड्यात आणण्यापासून ते मोठे करण्यापर्यंत अनेकांनी जिवाचे रान केले; परंतु पक्षातील काही संधिसाधू राजकारण्यांनी ज्यांना अडगळीत टाकले, अशा सर्व जुन्या मातब्बरांनी नव्या जोमाने शिवसेनेला पोखरण्यासाठी नवी मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या महिनाभरात मराठवाड्याचा दौरा करून अडगळीला पडलेल्या शिवसैनिकांसह इतर सर्व पक्षांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून नवीन पक्षाची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती बुधवारी दिवाळी स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.माजी आ. कैलास पाटील, मनसे राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील, माजी महापौर सुदाम सोनवणे, माजी मनपा सभागृह नेते अविनाश कुमावत, रमेश सुपेकर, छबूराव गीते, राजू कुलकर्णी, भाऊसाहेब शिंदे, ईश्वर गायकवाड, सदानंद शेळके, नंदू थोटे आदींची या वेळी उपस्थिती होती. सुभाष पाटील म्हणाले, मी दोन महिन्यांपासून पक्षात सक्रिय नाही.मी मनसे सोडल्यातच जमा आहे. मुंबईतील नेत्यांच्या पुढे-पुढे करीत असताना कंबरडे मोडले आहे. अशीच अवस्था इतर सर्वांची आहे. सर्व जुने निष्ठावंत मिळून नवीन पक्ष काढण्याच्या विचारात आहोत. आम्हाला यासाठी विभागातून अनेकांनी संपर्क करून ही कल्पना दिली आहे.शिवसेनेचे पूर्णत: व्यापारीकरण झाले आहे. आम्ही काँगे्रसच्या विरोधात शिवसेना उभी केली होती. पण आता शिवसेनेचे काँग्रेसीकरण सुरू झाले आहे. ३० वर्षांपूवी औरंगाबाद व मराठवाड्याचे जे प्रश्न होते ते आजही कायम आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला. नारायण राणे यांना समर्थन देणार काय, यावर माजी महापौर सोनवणे म्हणाले, कुणालाही पाठिंबा देणार नाही. यामागे कुणीही सूत्रधार नसल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाड्याच्या दौºयानंतर पक्षाचे नाव व स्थापनेबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.नवीन समीकरणाचा लाभ कोणाला होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़यामागे सूत्रधार कोण?- या सगळ्या मोटबांधणीमागे कोण सूत्रधार आहे, हे अद्याप समोर आले नसले तरी नवीन वर्षात मराठवाड्यात जुन्या निष्ठावंतांची ‘मराठवाडा शिवसेना’ स्थापन होण्याची दाट शक्यता आहे.- नाराज कार्यकर्त्यांचा नवीन पक्ष स्थापन करण्यामागे आणि त्याचे कार्यक्षेत्र मराठवाड्यापुरते ठेवण्यामागे मोठे राजकारण असल्याचे दिसते आहे. यामागे कदाचित भाजपामधील चाणक्यांची सुपीक बुद्धी असावी, अशी चर्चा आहे.
शिवसेनेला पोखरण्यासाठी जुन्या सैनिकांची नवी मोट! मराठवाड्यात मोर्चेबांधणी, पक्षाची घोषणा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:26 AM