औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एका तरुणाने वृद्धाचा खून केल्याची घटना पायलटबाबानगरी चौकात बुधवार रोजी घडली. फिलीप वामन वाघमारे (६५, रा. संतोषीमातानगर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सम्राट हॉटेलसमोर त्यांना हल्ला करून ठार केले होते.
वैद्यकीय आहवालातही त्याच्या अंगावर जखमा, डोक्याच्या पाठीमागून जखम असल्याने मृत्यू झाला, असा अभिप्राय शवविच्छेदनात डॉक्टरांनी आहवालात दिला होता. शांताबाई वाघमारे यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी फौजदार संजय बनसोड, सहायक फौजदार शेख हारुण, क ौतिक गोरे, पोहेकॉ. शेख असलम, कैलास काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांच्या पथक पाठविले.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून अमोल शिवाजी चौरे (२९, रा. जयभवानीनगर) यास शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु विश्वासात घेतल्यानंतर त्याने वाघमारे या वृद्धाच्या खुनाची कबुली दिली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दोघांत हाणामारी झाली. त्यातच तो जखमी होऊन मयत झाल्याचे अमोलने पोलिसांना सांगितले. आरोपी अमोल चौरे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. अधिक तपास फौजदार संजय बनसोड करीत आहेत.
शवविच्छेदनाच्या अहवालातून खुनाचे गूढ उलगडलेफिलीप वामन वाघमारे मृत्यूप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनप्रसंगी मृतदेह पाण्याने धुतला असता अंगावरील जखमा आणि डोक्याच्या मागे असलेली मोठी जखम त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे जाणवले. मारहाण व डोक्याच्या मागील भागास झालेली जखम हे त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे डॉक्टरांनी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे मारहाणीमुळे मृत्यू कसा होऊ शकतो म्हणून वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी स्थळ पंचनामा केला; परंतु घटनास्थळी तसे काही आढळून आले नाही. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हेगारापर्यंत पोलिस पोहोचले.
दारू पिऊन देत होता शिव्यादारूच्या नशेत वृद्ध शिव्या देत होता. हॉटेल व्यावसायिक अमोल शिवाजी चौरे याच्यासोबत त्याचा वाद झाला व त्यातूनच त्या वृद्धाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. त्याने वृद्धाला कसे मारले त्याविषयीची सखोल माहिती आरोपीकडून मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.