लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीची मागील अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वसाहतीमध्ये जवळपास ९० निवासस्थाने असून या ठिकाणी पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहेत. नवीन पोलीस वसाहतीमध्ये २०० क्वार्टरच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप मात्र कामास प्रारंभ करण्यात आला नाही.नागरिकांच्या संरक्षणासाठी चोवीस तास सदैव सज्ज असणाºया पोलिसांना सुरक्षित निवारा मिळणेही दुरापास्त झाले आहे. हिंगोली शहरातील जुनी वसाहतीचे बोलके चित्र हे त्याचे उदारण आहे. मागील अनेक वर्षांपासून वसाहतीमध्ये अधिकारी कर्मचारी वास्तव्यास आहेत. परंतु येथील घरांची प्रशासनाकडून साधी डागडुजीदेखील केली जात नाही, हे विशेष. त्यामुळे वसाहतीमधील दुरवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. येथील खोल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेकांनी तर जागा अपुरी पडत असल्यसाने स्वखर्चातून टीनपत्रांची शेड उभारली आहेत. शासनाकडून मात्र येथे वास्तव्य करणाºया पोलिसांकडून नियमित भाडे वसूल केले जात असले तरी देखभाल दुरूस्ती होताना दिसत नाही. सिमेंटपत्रेही आता धोकादायक बनत चालले असून, भिंतींना मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. स्वच्छतागृहे तर पूर्णत: मोडकळीस आले आहेत. परिणामी, दुर्गंधीमुळे पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या परिसरातील नाल्यांचा प्रश्न व गाजर गवतही मोठ्या प्रमाणात वाढल्याने वसाहत अस्वच्छतेच्या विळख्यात सापडत चालली आहे.याकडे पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या वसाहतीची दुरुस्ती करण्याऐवजी नवीन इमारती उभारणीचे कामे करणे गरजेचे आहे.
जुन्या पोलीस वसाहतीची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:15 AM