औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात सुरू झाले आहे. शहरात ११ ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जुने मोडकळीस आलेले काही जलकुंभ पाडून नवीन बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिन्सीतील खासगेट, ज्युब्लीपार्क येथील जागांची पाहणी केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. शहरात विविध वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकण्याचेही काम करण्यात येत आहे. नक्षत्रवाडी येथे पाण्याचा साठा करण्यासाठी मोठे एमबीआर उभारण्यात येत असून, प्रत्येक कामात महापालिका सहकार्य करीत आहे. शहरात एकूण ५६ नवीन जलकुंभ योजनेत उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. टी.व्ही. सेंटर मैदानाच्या पाठीमागे उंचीवर दोन मोठे जलकुंभ बांधण्याचे ठरले आहे. ज्या ठिकाणी महापालिकेची जागा उपलब्ध आहे, तेथील जागा जलकुंभासाठी देण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. बुधवारी खासगेट येथे मनपाच्या जवळपास अडीच एकर जागेची पाहणी करण्यात आली. योजनेचे समन्वयक हेमंत कोल्हे उपस्थित होते. खास गेट येथे जुनी वापरात नसलेला जलकुंभ आहे. येथे मोठा जलकुंभ उभारण्यासाठी जागाही बरीच लागणार आहे. मनपाच्या जवळपास दोन एकर जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. एका बाजूला मनपाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतर घरे रिकामी केली नाहीत. उलट तेथे अधिक बांधकाम करून अनेक वर्षांपासून राहत असल्याचेही पाहायला मिळाले. लवकरच यासंदर्भातही प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय स्वतंत्रपणे निर्णय घेतील.