औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात (चिकलठाणा) सोमवारी एका महिलेच्या गर्भाशयातील दीड किलो वजनाचा गोळा काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयात किमान १ लाख रुपयांचा खर्च लागला असता. मात्र जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया अवघ्या २६० रुपयांत झाली.
वाळूज येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीत गोळा तयार झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे महिलेला प्रचंड त्रास होत होता. शस्त्रक्रियेसाठी ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. स्त्रीरोग विभागाचे डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी सोमवारी शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून दीड किलोचा गोळा काढला. या शस्त्रक्रियेत गर्भपिशवीही काढावी लागली. दीड तास शस्त्रक्रिया चालली. डाॅ. कविता जाधव, भूलतज्ज्ञ डाॅ. वैशाली जाधव, परिचारिका धारकर, वानखेडे, कर्मचारी अभिषेक आदींनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांनी मार्गदर्शन केले.
अनेकदा निदानही होत नाहीअनेकदा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्याची बाह्य लक्षणे दिसत नाहीत आणि म्हणूनच त्याचे वेळेत निदान होत नाही. अनेकांना याचा त्रास जाणवत नसतो, असे डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले. एखाद्या वेगळ्याच आजारासाठी तपासणी केली जाते, त्यावेळी गर्भाशयात गाठी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास येते.
कोणत्या वयाेगटात होतात गाठी?गर्भाशयातल्या कुठल्या भागात गाठ आहे, यावरून ती कुठल्या प्रकारची आहे, हे ठरत असते. बहुतांश वेळा गर्भाशयाच्या भिंतीवर गाठी येतात. ३० ते ५० वर्ष वयोगटातल्या महिलांमध्ये गर्भाशयात गाठी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लठ्ठ महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकाचं प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्या गर्भाशयात गाठी होण्याचे प्रमाणही अधिक असते. ज्या महिलांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, अशा स्त्रियांमध्येही ही समस्या आढळून येते, असे तज्ज्ञांनी सांगितले.