छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या पैठण येथील जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पात आज १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील उन्हाळ्यातील तापमान ४३ अंशांपर्यंत गेलेले आहेत. उन्हाचा चटका वाढताच जायकवाडीतील पाण्याचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात होते. वर्षभरात सरासरी १२ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होऊन हे पाणी हवेत मिसळत असल्याचे समोर आले आहे.
नाथसागरात आज १३३९ दलघमी पाणीसाठाजायकवाडी धरणातून मराठवाड्यातील सुमारे दीड लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, जिल्ह्यातील शेकडो गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. आज या धरणात १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराला पाच दिवसांआड पाणीशहराची वाढत्या लोकसंख्येसाठी जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असल्याने सर्व वसाहतींना रोज पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. यामुळे गेली काही वर्षे आपल्या शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. याविषयी नाराजी व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.
शहराला रोज किती लागते पाणी?छत्रपती संभाजीनगर शहराला महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर अशी जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. जुन्या जलवाहिनीद्वारे १४० एमएलडी रोज पाणीपुरवठा शहराला केला जातो. हा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने हर्सूल तलावातून ६ एमएलडी पाणी घेण्यात येते, तर विविध वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीकडूनही प्रतिदिन सुमारे दोन एमएलडी पाणी घेण्यात येते.
रोज १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होतेएप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे. ६ एप्रिल रोजी जायकवाडी धरणातील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे बाष्पीभवन मापक यंत्राच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
अधिकाऱ्याची प्रतिक्रियामराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून दररोज किती पाण्याचे बाष्पीभवन होते, याबाबतचा अहवाल रोज शासनास देण्यात येतो. हे बाष्पीभवन मोजण्यासाठी धरणस्थळी बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आले आहेत. साधारणपणे वर्षभरात दहा ते बारा दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. विशेषत: मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत बाष्पीभवन होण्याचे प्रमाण सर्वाधिक तर पावसाळ्यात सर्वात कमी असते. धरणाशेजारी पक्षी अभयारण्य असल्याने बाष्पीभवन रोखण्याची केमिकल प्रक्रिया करता येत नाही.- व्ही. पी. काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी प्रकल्प