औरंगाबाद : शहरात रिक्षाचालक, मजूर आणि महाविद्यालयीन तरुणामध्ये गांजा ओढण्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढतच आहे. मागणीनुसार शहरातील विविध वसाहतींमधून चोरट्या मार्गाने गांजा विक्री सुरू आहे. गांजा खरेदी विक्रीमधून शहरात रोज सुमारे १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे सूत्राने सांगितले.
गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी एकत्रित कारवाई करीत तब्बल ५७ किलो गांजा जप्त केला. या कारवाईला २४ तास होत नाही तोच मुकुंदवाडी पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराकडून ८७५ ग्रॅम गांजा जप्त केला. लॉकडाऊन कालावधीत दौलताबाद पोलिसांनी गांजा घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडले होते. सिडको पोलिसांनी असाच मोठा साठा जप्त केला होता. नशेखोरांच्या बाजारात गांजाची १० ग्रॅमची पुडी १०० रुपयाला विक्री होते. तुटवडा असेल तर हा दर २०० रुपयांपर्यंत जातो. अशा पद्धतीने शहरात दररोज किमान १० हजार गंजेटीपर्यंत हा गांजा पोहोचत असावा, असा पोलीस यंत्रणेचा कयास आहे. यावरून शहरात दररोज किमान १० लाख रुपये गांजाची विक्री होत असावी, असा अंदाज आहे.
त्याला म्हणतात, सुक्का...गांजाची नशा करणाऱ्यास सुक्का संबोधले जाते. सिगारेटमधील तंबाखू काढून त्यात गांजा भरून ओढला जातो, तर काही लोक चिलीममध्ये गांजा भरून पितात. गांजाचे व्यसन आता महाविद्यालयीन तरुणापर्यंत गेले आहे. ‘सुक्क्याची’ नशा करणाऱ्यांची सवय लागली की, मग रोज त्याची मागणी होते. त्यामुळे याचे ग्राहक दररोज वाढतच आहेत.
पाॅकेटमनीचा वापर गांजासाठीपालकांकडून विद्यार्थ्यांना दररोज पाॅकेटमनी दिला जातो. मात्र, हे पैसे महाविद्यालयीन तरुण गांजावर खर्च करतात, असे निदर्शनास येते आहे. दारू, बिअरचा उग्र वास येतो. तसा गांजाची नशा केल्यावर येत नाही. यामुळे मुले गांजाकडे वळत असल्याचे सूत्राने सांगितले. नशेतील तरुण कोणत्याही स्तराला जाऊन अघोरी व गुन्हेगारी कृत्ये करतात.
विशाखापट्टणम, आंध्रमधून येतो गांजाशहरात अनेक वर्षांपासून आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून गांजा आणला जातो. पूर्वी रेल्वेने गांजाचे पार्सल येत असे. आता रेल्वेमधील मालाची कसून तपासणी होत असल्यामुळे तस्कर खासगी ट्रॅव्हल बस आणि कारमधून चोरट्या मार्गाने शहरात गांजा आणतात. बाहेरील राज्यांतून आणलेल्या गांजाची शहरातील चिल्लर विक्रेत्यांना ठोक दराने रात्रीतून विक्री होते. हा व्यवहार करताना विश्वासू माणसे व गुप्तता पाळली जाते. यामुळे गांजा विक्रीचे शहरातील विविध कॉलनीतील अड्डे बिनधास्तपणे सुरू आहेत. १० ग्रॅमच्या पुड्या करून व्यसनी लोकांना ते विक्री करतात. शहरातील कोणत्याही उद्यानात आणि मैदानावर दिवसरात्र हे नशेडे तरुण बसलेले दिसतात.