औरंगाबाद : कोरोनाच्या ( Corona in Aurangabad ) ओमायक्राॅन व्हेरिएंटच्या ( Omicron Variant) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून त्यांची कोरोना चाचणी केली जाते. मात्र, काही प्रवासी खोटी माहिती देत असल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनीही लक्ष ठेवण्याची गरज आहे.
दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत गेल्या १९ दिवसांत तब्बल एक हजार प्रवासी आले. औरंगाबादेत थेट आंतरराष्ट्रीय विमान येत नाही. मात्र, परदेशवारी करून मुंबई, दिल्ली, हैदराबाद विमानसेवेद्वारे प्रवासी औरंगाबादेत येतात. त्यामुळे कोरोनाच्या नव्या म्युटंटचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून औरंगाबादेत किती प्रवासी आले, याचा शोध घेतला जात आहे.
शहरात ११४, ग्रामीणमध्ये ११शहरात सोमवारपर्यंत परदेशातून ११४ जण आल्याची माहिती महापालिकेला प्राप्त झाली होती, तर ग्रामीण भागात ११ जण आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मिळाली. प्रवाशांची यादी अद्ययावत होत असल्याने ही संख्या आणखी वाढणार आहे.
१२० जणांची टेस्ट, सर्वच निगेटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत परदेशातून आलेल्या १२० जणांची टेस्ट करण्यात आली. यात शहरातील ११० आणि ग्रामीणमधील १० जणांचा समावेश आहे. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
हायरिस्क देशातून आले प्रवासीदक्षिण आफ्रिकेतून शहरात आलेल्या आणि एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये उतरलेल्या एका प्रवाशाची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याबरोबर शहरात दक्षिण आफ्रिकेसह नेदरलँड आणि युरोपियन देशात प्रवास करून नागरिक परतले आहेत.
विमानतळावर चाचणी झाली पुढे काय ?परदेशातून येणाऱ्या बहुतांश प्रवाशांची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी केली जात आहे. हे प्रवासी शहरात आल्यानंतरही आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. सर्व प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सात दिवसानंतर पुन्हा आरपीसीआर तपासणी केली जाणार आहे. तोपर्यंत त्यांना घरातच क्वाॅरंटाईन राहण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रवाशांची कोरोना चाचणीदक्षिण आफ्रिकेसह युरोपीयन देशांतून शहरात आलेल्या विमान प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. प्राप्त माहितीवरून प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा