छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत सर्वत्र उत्साह, आनंद असताना सतत वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने नागरिकांच्या वाट्याला मनस्ताप येत आहे. दुपारी ४ वाजल्यानंतर मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते जॅम होऊन शहर राेज किमान ७ तास वाहतुकीच्या खोळंब्यात अडकते आहे.
अनेक महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या वाहतुकीवरून पोलिस, मनपा प्रशासनावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. अरुंद रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्तपणे उभ्या चारचाकी, अवजड वाहनांची शहरात राजरोस ये-जा, मनपाने खोदून ठेवलेले रस्ते, शासकीय ठेकेदारांचे रस्त्यावरील साहित्यांची समस्या जटिल झाली आहे. नागरिक दुपारी ४ वाजल्यानंतर खरेदीसाठी बाहेर पडतात. शहागंज, गुलमंडी, पैठण गेट, कासार गल्ली येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्ते देखील जॅम होत आहे. मोंढा नाका, शहानुरमिया दर्गा परिसर व उड्डाणपूल, शहागंज, गुलमंडी, पैठण गेट, सिटी चौक, संपूर्ण जालना रोड, सिडको चौक, धुत रुग्णालय ते चिकलठाणा, टी. व्ही. सेंटर मध्ये रोज दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत वाहने खोळंबतात.
ऐन दिवाळीत दंडाची शिक्षापोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या वाहतूक पोलिसांना सण उत्सवात कारवाईपेक्षा नियमनावर भर देण्याच्या सूचना आहेत तरीही वाहतूक पोलिस कारवाईत व्यस्त दिसतात. राजरोस सुसाट वेगात फिरणाऱ्या जड अवजड वाहनांकडे दुर्लक्ष करुन नियमांच्या नावाखाली खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सामान्यांच्या नावे पावत्या फाडल्या जात आहेत. मंगळवारी सायंकाळी माेंढा उड्डाणपुलावर विना क्रमांक हायवा पंक्चर झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही हायवा जवळपास ८ तास तेथे उभी होती.
हा मनस्ताप वेगळाचशहरात मनमानी पद्धतीने मनपा, पोलिसांकडून दुचाकी उचलल्या जात आहे. खरेदी सोडून वाहन सोडवण्यासाठी धावण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. खरेदी राहते बाजूला, त्यात दंडाच्या भुर्दंडामुळेही संताप व्यक्त होत आहे.
१७० जणांवर नियमनाचा भारशहर पोलिस वाहतूक विभागात २१८ अंमलदार आहेत. त्यापैकी जवळपास ३० अंमलदार कार्यालयीन कामासाठी आहेत. काही साप्ताहिक, रजेवर असतात. उर्वरीत जेमतेम अंमलदारांवर वाहतूक नियमनाची जबाबदारी आहे. शिवाय मनपा प्रशासकांनी गणेशोत्सवात घोषणा केलेल्या ट्रॉफिक वॉर्डनची पोलिसांसह सर्वसामान्यांनाही अद्यापही 'प्रतीक्षाच आहे.