छत्रपती संभाजीनगर : जास्त पाऊस न पडल्याने झेंडूच्या वाढीला पोषक वातावरण तयार झाले. नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेलाच भाव गडगडून अवघ्या १० रुपये किलोने झेंडू विक्री झाला. शुक्रवारी ३० रुपये किलोने झेंडू विकत होता, कारण शेतकऱ्यांनी दसऱ्यासाठी झेंडू राखून ठेवल्याने भाव वाढले होते; पण सोमवारी परजिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक होऊन भाव पुन्हा कमी होतील, दसऱ्याला झेंडू शेतकऱ्यांना रडवेल; पण दिवाळीला झोळी भरून जाईल, अशी चिन्हे आहेत.
एरवी फुलाची शेती न करणारे मात्र दसऱ्याला एखाद्या एकरमध्ये आवर्जून झेंडूची लागवड करतात. कमी पावसामुळे झेंडू चांगला खुलला आहे. म्हणूनच तर नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला ७० ते ८० क्विंटलपेक्षा अधिक आवक होऊन भाव १० रुपयांपर्यंत गडगडले होते. यामुळे शेतकऱ्यांनी नंतर आवक रोखून धरली. शुक्रवारी ३० रुपये किलो भाव होता. शेतकऱ्यांनी दसऱ्यासाठी शेतातील झेंडू काढणे बंद केले आहे. रविवारपासून बाजारात झेंडूची आवक होईल. मंगळवारच्या पहाटेपर्यंत शहरात जिल्ह्यातूनच नव्हे तर हिंगोली, जिंतूर, परतूर या भागांतून मोठी आवक होईल. मागील वर्षी दसऱ्याच्या आधी झेंडू सुरुवातीला १०० ते १५० रुपये किलोपर्यंत विकला होता. अखेरीस ४० ते ५० रुपये किलोने विक्री झाला. मागील वर्षी खराब झेंडू मोठ्या प्रमाणात विक्रीला आला. यंदा टवटवीत येत आहे. दसऱ्याला विक्रेते सुरुवातीला ८० रुपये किलो विक्रीचा प्रयत्न करतील; पण झेंडूचे भाव ५० रुपयांवर जाणार नाहीत. भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी झेंडू काढून टाकतील व पुढील महिन्यात दिवाळीला झेंडू १०० रुपयांपर्यंत विकला जाईल, असा अंदाज झेंडू उत्पादक व्यापारी बाबासाहेब तांबे यांनी व्यक्त केला. १० रुपयांपर्यंत खाली भाव आल्याने आम्ही काढणी केली नाही. दसऱ्याला भाव जिथे जास्त असतील, तिथे पाठवू, अशी माहिती शेतकरी खलील पटेल यांनी दिली.
खराब झेंडू रस्त्यावरजाधववाडीतील कृउबा समिती अडत बाजारात सध्या तुरळक आवक होत आहे. तिथे २५ ते ३० रुपये किलो दर आहे. संपूर्ण झेंडू विकला जात नसल्याने १ ते दीड क्विंटल फुले रस्त्यावर फेकून शेतकरी निघून जात आहेत.