छत्रपती संभाजीनगर : एक महिना झाला. वेळ संपला. आजच्या रात्रीत मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, असे आवाहन सरकारला करतानाच २० जुलैला हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे हे ठरवू, अशी पुढील रणनीती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी शहरातील क्रांतीचौकात आयोजित महाशांतता रॅली व संवाद यात्रेच्या सांगता सभेत घोषित केली. त्यांच्या या घोषणेला उपस्थित जनसागराने टाळ्यांच्या कडकडात जोरदार समर्थन दिले.
हिंगोलीतून सुरू झालेल्या महाशांतता व संवाद रॅलीचा समारोप जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केला. यावेळी ते म्हणाले, ५७ लाख कुणबी नोंदी सरकारला सापडल्या. त्यांच्या कुटुंबांना धरून साधारण दीड कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत. मी सरकारला जाहीरपणे सांगतो, आमच्या नऊ मागण्यांची पूर्तता लवकर करावी.
मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे हे ठरवू. यावेळी त्यांनी छगन भुजबळ, महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.