औरंगाबाद : बीड बायपासवर संग्रामनगरलगत सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला ‘उड्डाणपूल’ नसून तो ‘वाहनांसाठीचा भुयारी मार्ग’ (व्हेहीक्युलर अंडर पास) आहे. माध्यमांनी चुकीची माहिती छापली आणि राजकारण्यांनी त्याला वेगळा रंग दिला. त्यामुळे तो उड्डाणपूल असल्याचा गैरसमज निर्माण झाला, असे तोंडी निवेदन सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी आज औरंगाबाद खंडपीठात केले.
अभियंत्यांनी विचारपूर्वक त्याचा आराखडा तयार करून पुलाचे आणि भुयारी मार्गाचे बांधकाम केले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकून ‘साइड ड्रेन’ ही तयार केले आहेत, असेही कर्लेकर यांनी म्हटले. या जनहित याचिकेचे याचिकाकर्ता (पार्टी इन पर्सन) ॲड. रुपेश जैस्वाल यांनी संग्रामनगर येथील पुलाची काही छायाचित्रे दाखवून काही मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळेअभावी याबाबत सुनावणी झाली नाही. पुढील तारखेला २ फेब्रुवारीला यावर सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर येथील भुयारी मार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया चालू आहे. त्यासाठीचे मूल्यांकन एक आठवड्यात विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना देऊ, असे निवेदन मनपातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी केले, तर या भुयारी मार्गाच्या आराखड्यात दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ जानेवारी २०२३ रोजी रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला सुमारे तीन आठवड्यांत मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी केले.
‘लोकमत’ने सर्वात आधी मांडली वस्तुस्थिती...बीड बायपासवर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या उंचीवरून संभ्रम निर्माण झाल्याप्रकरणी २३ डिसेंबर २०२२ च्या अंकात ‘लोकमत’ने तांत्रिक माहितीच्या आधारे वृत्त प्रकाशित केले होते. ‘व्हीयूपी’ म्हणजे ‘व्हेईकल अंडरपास’ व ‘व्हीओपी’ म्हणजे ‘व्हेईकल ओव्हरपास’ म्हणजे पुलावरून आणि खालून वाहतुकीसाठी केलेली व्यवस्था तेथे असणार आहे. ३८३ कोटी रुपयांतून बायपास रोडवर तीन पुलांचे काम होत आहे. नेमकी वाहतूक कशी असणार? उड्डाणपुलांची उंची कमी तर नाही ना, यासारखे प्रश्न त्या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना पडत आहेत. संग्रामनगर पुलाचे लँडिंग आणि नवीन पुलाखालील अंडरपास यांचा उतार प्रतापनगरच्या नाल्याच्या दिशेने वळविण्यात आला आहे. देवळाई चौकातील पुलाखालीही साडेपाच मीटर उंची असेल, असा दावा करण्यात येत आहे. तिन्ही पुलांच्या खाली सव्वा ते पावणेदोन मीटरपर्यंत खोली करून वाहतूक रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. हे सगळ्या तांत्रिक आराखड्यानुसार आहे. यात बदल होणार नाही. पुलाखालील अंडरपासचे पाणी प्रतापनगर नाल्यात पाइपने साेडण्यात येईल, असे डिझाइन तयार केले आहे.