वाळूज महानगर : बहिणीच्या घरी राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने रक्षाबंधनाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी वडगाव कोल्हाटीत उघडकीस आली. ‘आईचा सांभाळ कर’, अशी बहिणीच्या नावे चिठ्ठी लिहून आकाश सर्जेराव शिंदे (रा. खैरका, ता. मुखेड) याने जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आकाशच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले असून, त्याला एक विवाहित बहीण व आई आहे. आकाश वडगावात बहीण सुनंदा गोंधळे यांच्या घरी वास्तव्यास आला होता. तो उद्योगनगरीतील एका कंपनीत काम करीत होता. बुधवारी रक्षाबंधन असल्याने सुनंदा दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी आल्या. घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेकदा हाका मारूनही आकाश दरवाजा उघडत नव्हता. खिडकीतून पाहिले असता आकाश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सुनंदा यांनी आरडाओरडा केला असता शेजारी धावून आले. पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश सगरे, किशोर गाडे, युसूफ शेख यांनी आकाशला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
आकाशकडे पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत आकाशने बहिणीस उद्देशून ‘आज माझा शेवटचा दिवस आहे, मी खूप दिवसांपासून परेशान आहे. मला शांतता हवी आहे. ताई, तू आईचा सांभाळ कर’, अशा आशयाचा मजकूर लिहून ठेवला. रक्षाबंधनाच्या दिवशीच भाऊ आकाशने जीवन संपविल्याने बहिणीच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळेही पाणावले. एमआयडीसी वाळूज पोलिस आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.