औरंगाबाद : राजस्थानमधील मध्यान्ह भोजन गैरव्यवहारात देशभरातील ५० हून अधिक संशयितांच्या घर व कार्यालयावर आयकर विभागाने मागील बुधवारी छापेमारी केली होती. त्यातील एक औरंगाबादेमधील उद्योजक सतिश व्यास यांचे निवासस्थान व कार्यालयातही मागील तीन दिवसांपासून सलग चौकशी व तपासणी सुरु होती. आज शनिवारी दुपारी ही तपासणी संपली. जयपूर, पुणे, नाशिक येथील अधिकाऱ्यांचे पथक शहरातून रवाना झाले.
या छापेमारीची चर्चा शहरात मागील तीन दिवसांपासून चर्चीली जात होती. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. कारण, व्यास परिवार हा राजकारण, समाजकारण, धार्मिक कार्यात पुढे आहे. तसेच उद्योग व्यवसायातही या परिवाराने आघाडी घेतली आहे. या परिवाराच्या निवास्थानी व कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारीमुळे शहरात चर्चेला उधाण आले होते. काही अफवाही यानिमित्ताने पसरल्या.
उल्लेखीनय म्हणजे आयकर विभाग छापे टाकताना स्थानिक पोलीसांना सोबत नेत असते, पण प्रथमच जयपूर येथून आलेल्या आयकर अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान आणण्यात आले होते. उद्योजक व व्यावसायिकांमध्ये याचीच जास्त चर्चा होती. तीन दिवसांपासून तपासणी सुरू असल्याने ही चर्चा आणखी रंगत गेली.
आयकर अधिकाऱ्यांनी व्यास परिवाराचे व्यवसाय, व्यवहार, बँक खाती, सोने-चांदी, संपत्तीची तपासणी व चौकशी केली. अनेक दस्ताऐजाचे ‘डिजिटल प्रिंट’ काढण्यात आले. आज चौकशीचा चौथा दिवस होता. दुपारीनंतर अधिकारी तपासणी संपवून रवाना झाल्याची माहिती आयकर विभागातील सूत्रांनी दिली, मात्र, आयकर विभागाने छापासत्राबद्दल अधिकृत माहिती दिली नाही.